Edition

व्यसनाच्या अंधाराविरुद्ध ‘नॉट नॉर्मल’चा एल्गार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती ग्रामीण पोलिसांच्या ‘ऑपरेशन कवच’ला सर्जनशील माध्यमाची जोड; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ट्रेलरचे अनावरण

अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) :  ड्रग्जसह विविध प्रकारच्या व्यसनांच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईसमोर निर्माण झालेल्या गंभीर सामाजिक आव्हानाला भिडण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी जनजागृतीचा प्रभावी मार्ग स्वीकारला आहे. ‘ऑपरेशन कवच’ या व्यसनविरोधी उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘नॉट नॉर्मल’ या लघुपटाच्या ट्रेलरचे अनावरण महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोमवारी नियोजन भवन येथे करण्यात आले.

पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध आढावा बैठकीनंतर या लघुपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप अडसड, उमेश यावलकर, प्रवीण तायडे, रवि राणा, केवलराम काळे यांच्यासह विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले आणि पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते.

व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी केवळ कारवाई पुरेशी नसून त्यासोबत सातत्यपूर्ण जनजागृतीची आवश्यकता आहे. याच भूमिकेतून अमरावती ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन कवच’च्या माध्यमातून व्यसनविरोधी संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून स्थानिक कलाकार, कंटेंट क्रिएटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्या सहभागातून ‘नॉट नॉर्मल’ची निर्मिती करण्यात आली आहे.

तरुण पिढीला नशेच्या आकर्षणापासून दूर ठेवणे, व्यसनाचे वैयक्तिक तसेच कौटुंबिक परिणाम अधोरेखित करणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश देणे, हा या लघुपटाचा मुख्य उद्देश आहे. ‘नशेचा नकार… जीवनाचा स्वीकार!’ हा संदेश केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला हा लघुपट मनोरंजनासोबतच सामाजिक वास्तवाचे भान जागविण्याचा प्रयत्न करतो.

पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक कलावंतांना संधी देत या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्थानिक प्रतिभेला सामाजिक विषयाशी जोडत व्यसनविरोधी अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रेम माणिक यांनी केले असून, छायाचित्रणाची जबाबदारी शुभम जगदाळे यांनी सांभाळली आहे. ईश्वर सुतार, शितल भिलावेकर आणि आरिश शाह यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. स्थानिक कलाकारांच्या अभिनयातून व्यसनाच्या दुष्परिणामांचे वास्तववादी चित्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

व्यसनाधीनतेचा प्रश्न हा केवळ एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नसून त्याचे पडसाद कुटुंब, समाज आणि पुढील पिढीवर उमटतात. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईसोबतच समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग आणि सातत्यपूर्ण जनजागृती आवश्यक आहे. ‘नॉट नॉर्मल’च्या माध्यमातून याच सामाजिक जाणीवेला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान, लघुपटाचा अधिकृत ट्रेलर यूट्यूबवर उपलब्ध करण्यात आला असून, व्यसनविरोधी जनजागृतीच्या या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देत संदेश अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें