Edition

भूदान जमिनीच्या वर्गवारीत कोट्यवधींचा घोटाळा?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कापूसतळणीतील प्रकारः मार्चमध्ये जमीन वर्ग-१ अन् जूनमध्येच खरेदी-विक्री

 

अमरावती : शासकीय नियमांना हरताळ फासून अमरावती तालुक्यातील मौजा कापूसतळणी येथे भोगवटादार वर्ग-२ च्या शासकीय भूदान जमिनी अत्यंत संशयास्पदरीत्या वर्ग-१ मध्ये रूपांतरित करून त्याची तातडीने विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील सर्व्हे नं. १८९, १९० आणि १९१ या जमिनींबाबत अवघ्या काही महिन्यांतच खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार पार पडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी लेखी तक्रार महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्याकडे करण्यात आली आहे. या व्यवहारात मोठे आर्थिक लागेबांधे आणि प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांना २२ सप्टेंबर २०२६ रोजी पाठविलेल्या अधिकृत तक्रारीत अमरावती येथील सर्वेश अंबाडकर यांनी या घोटाळ्याचा सविस्तर पाढा वाचला आहे. कापूसतळणी येथील संबंधित भूदान जमिनी शेतसाऱ्याच्या केवळ ४० पट रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याचे आदेश १० मार्च २०२६ रोजी देण्यात आले होते. मात्र, हा शासकीय आदेश निघाल्यानंतर अत्यंत अल्प कालावधीतच, म्हणजेच अवघ्या अडीच ते तीन महिन्यांतच या जमिनींची घाईघाईने विक्री करण्यात आली.

असा झाला खरेदी-विक्रीचा ‘खेळ’ उपलब्ध शासकीय फेरफार नोंदीनुसार, सर्व्हे नं. १९१ (क्षेत्र १.२३ हे.आर.) ही जमीन बन्सी बाबन इंगळे यांनी अनिल बन्सीरामजी मोहोड यांना दुय्यम निबंधक, अमरावती (ग्रामीण) यांच्या कार्यालयातील खरेदीखत क्र. २१०८ अन्वये ३ जून २०२६ रोजी १२,५०,००० रुपयांच्या मोबदल्यात विकली. विशेष म्हणजे, याचा फेरफार क्र. १६५१ अवघ्या पाच दिवसांत म्हणजेच ८ जून २०२६ रोजी मंजूर करण्यात आला आणि फेरफार नोंदीत जमीन भोगवटादार वर्ग-१ असल्याचे नमूद करून नोंद प्रमाणितही करण्यात आली.

 

भूदान जमीन वर्गवारी करताना कुळाचे कागदपत्र संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने चौकशी सुरु असून शासनाकडे प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला आहे. मात्र याविषयी वरिष्ठांकडून कोणतेही पत्र प्राप्त नाही.

अनिल भटकर,उपविभागीय अधिकारी, अमरावती

दुसऱ्या जमिनीचाही २४ तासांत व्यवहार!

असाच संशयास्पद प्रकार सर्व्हे नं. १९० (क्षेत्र ०.९१ हे.आर.) या जमिनीबाबतही घडला. ही जमीन गणेश बाबन इंगळे यांनी त्याच खरेदीदार व्यक्तीला म्हणजेच अनिल बन्सीरामजी मोहोड यांना खरेदीखत क्र. २०८४ अन्वये २ जून २०२६ रोजी ९,२०,००० रुपयांत विकली. याचा फेरफार क्र. १६४९ असून यातही जमीन वर्ग-१ दाखवण्यात आली आहे. या दोन्ही व्यवहारांमध्ये सर्व्हे नं. १८९ चाही समावेश असून, या मागचे मूळ वर्ग-२ चे अभिलेख, सनद, ७/१२ उतारे, शासकीय रक्कम भरण्याचे चलन आणि विक्रीनंतरचे फेरफार तपासून स्वतंत्र चौकशीची मागणी तक्रारीत केली आहे.

व्यवहारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह; ‘मंत्रालयातून’ हालचाली ?

भूदान चळवळीतील जमिनी या गरीब आणि भूमिहीनांसाठी राखीव असतात. अशा जमिनींची वर्गवारी बदलून लक्षावधी-कोट्यवधी रुपयांचे व्यवहार तात्काळ कसे मंजूर झाले, यावरून महसूल वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या सर्व व्यवहारांच्या वैधतेबाबत आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आणि यात दोषी आढळल्यास संबंधित महसूल अधिकारी व लाभार्थ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. अतिरिक्त मुख्य सचिवांकडे तक्रार गेल्याने आता मंत्रालयातून यावर काय पावले उचलली जातात, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें