वन्यजीव सप्ताहातून निसर्ग संवर्धनाचा जागर; मेळघाटात विविध जनजागृती उपक्रमांची पर्वणी
२ ते ८ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा सहभाग; प्रदर्शन, स्पर्धा, निसर्गभ्रमंतीसह विविध कार्यक्रम
अमरावती : वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अधिवास जोडणीकरण, वन्यजीवांचे सक्षमीकरण’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून सप्ताहादरम्यान विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जाणार आहेत. वन्यजीवांचे अस्तित्व आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमांतून देण्यात येणार आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या या उपक्रमात अरण्यम् कंझर्व्हेशन सोसायटी, युथ फॉर नेचर कन्झर्व्हेशन ऑर्गनायझेशन, नेचर सोसायटी, ऑर्गनायझेशन फॉर कुला, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था तसेच पर्यावरण संवर्धन शिक्षण संस्था यांचा सहभाग राहणार आहे. अमरावती शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थीही या सप्ताहात सहभागी होणार आहेत.
वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी अमरावती येथील कुलाढाप सभागृहात होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण स्वयंसेवक कार्यशाळा, बांबू उद्यानात निसर्गभ्रमंती आणि वन्यजीव विषयावरील चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच तापडिया सिटी सेंटर येथे वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार असून नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे.
सप्ताहाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव माहितीपट व चित्रपट प्रदर्शन, निसर्ग प्रश्नमंजुषा, पोस्टरनिर्मिती, पर्यावरणविषयक कविता आणि ‘वने व वन्यजीव : सहजीवन’ या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बिबट्यासोबत सहजीवनाबाबत जागरूकता कार्यशाळा, ‘टॉक विथ ट्री’, वन्यजीवविषयक व्याख्याने व सादरीकरणेही आयोजित केली जाणार आहेत. जलसंवर्धन आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दरम्यान, मेळघाट परिसरात प्लास्टिक संकलन व निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. चिखलदरा येथील निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरीक्षणाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला असून आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले जाणार आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वन, वन्यजीव आणि पर्यावरणाशी प्रत्यक्ष जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून नागरिकांनीही या सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने केले आहे.









