Edition

साताऱ्याची सुदेशना शिवणकर ठरली देशातील सर्वात वेगवान धावपटू, दम्याच्या आजारालाही लावलं पळवून, आता ऑलिम्पिकचे वेध!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खेलो इंडिया’ स्पर्धेत सलग 6 वर्षे सुवर्णपदक जिंकणारी, देशातील सर्वात वेगवान धावपटू ठरलेली महाराष्ट्राची सुवर्णकन्या सुदेशना शिवणकरला आता ऑलिम्पिकचे अवकाश खुणावत आहे.

सातारा – कसल्याच सुविधा नसताना मातीच्या ट्रॅकवर सराव करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकांवर स्वतःचं नाव कोरणारी साताऱ्याची सुदेशना शिवणकर देशातील सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे. अवघ्या 11.56 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिनं सुवर्णपदक पटकावलं. या कामगिरीनं संपूर्ण देशाचं लक्ष तिनं वेधून घेतलं आहे. मैदानावर पळता पळता सुदेशनानं दम्याच्या आजारालादेखील पळवून लावलं आहे. आता ती पूर्पपणे तंदुरुस्त असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवण्याचे सुदेशनाचे स्वप्न आहे.

सातारा जिल्ह्यातील खर्शी (ता. जावली) या छोट्याशा गावातील सुदेशना शिवणकर ही शाळेत खेळकर मुलगी होती. बालपणी तिला दम्याचा त्रास होता. धूळ आणि धुराचा खूप त्रास व्हायचा. त्यामुळे धूळ आणि धुरापासून तिला दूर ठेवले जात असे. सुदेशनाचे वडिल हणमंत शिवणकर हे पोलीस दलात आणि आई प्रतिभा या गृहिणी आहे. तिची आई प्रतिभा यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सांगितलं की, घरात स्वयंपाक करताना फोडणी जरी दिली तरी सुदेशनाला त्रास व्हायचा. त्यामुळे तिला काही वेळ बाहेर पाठवायला लागायचं. दुकानातून वस्तू आणायला पाठवलं तरी ती धावत जायची. त्यानंतर ती परत धावतच यायची.

 

बळवंत बाबर यांनी सुदेशनाचं आयुष्य घडवलं- वयाच्या 12 व्या वर्षापासून ती धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला लागली. सुरूवातीला तिला यश मिळालं नाही. त्यामुळे दोन-तीन वेळा ती निराश झाली होती. परंतु, 2018 मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत धावताना तिला तत्कालीन क्रीडा अधिकारी बळवंत बाबर यांनी पाहिलं. त्यांनी सुदेशनातील गुण हेरला. आम्हीही तिला प्रशिक्षणासाठी बळवंत बाबर यांच्याकडे पाठवलं. त्यांनी सुदेशनाकडून मातीच्या ट्रॅकवर सराव करून घेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकवलं. आम्ही आई-वडील म्हणून फक्त तिच्या गरजा पूर्ण केल्या. मात्र, प्रशिक्षक म्हणून बळवंत बाबर यांनी सुदेशनाचं आयुष्य घडवलं. तेच सुदेशनाचे खऱ्या अर्थानं भाग्यविधाता आहेत, असे सांगत आई प्रतिभा आणि वडील हणमंतराव शिवणकरांनी सुदेशनाच्या यशाचे श्रेय प्रशिक्षकांना दिलं.

 

 

सातत्यानं देशातील अव्वल धावपटू- साताऱ्यातील गोळीबार मैदान परिसरात असलेल्या सुदेशनाच्या घराचा संपूर्ण हॉल पदकांनी व्यापलाय. तिला मिळालेली बक्षिसे, प्रशस्तीपत्रे, शिल्ड आणि वेगवेगळी पदके हा आमच्यासाठी अनमोल असा खजिना असल्याचे सुदेशनाचे आई-वडील अभिमानानं सांगतात. तसेच लोक आम्हाला सुदेशनाचे पालक म्हणून ओळखतात, याचा अभिमान वाटतो. तसेच ऊर भरून येतो. 2018 पासून सुदेशना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतेय. 14 वयोगटापासून ती तिच्या वयोगटात सातत्यानं देशातील अव्वल धावपटू राहिली असल्याची माहिती वडील हणमंतराव शिवणकर यांनी दिली.

खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं- सुदेशनाचे प्रशिक्षक आणि सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी बळवंत बार यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सुदेशनाच्या क्रीडा गुणांचं आणि जिद्दीचं कौतुक केलं. ते म्हणाले की, एक दिवस ती माझ्याकडे आली. मी तिला पाहताच ओळखलं. एका तालुकास्तरीय स्पर्धेत 100 मीटरमध्ये तिनं अत्यंत वेगानं धावून स्पर्धा पूर्ण केली होती. मी पोलीस ग्राऊंडवर सराव घ्यायचो. त्याठिकाणी काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुली प्रशिक्षणासाठी यायच्या. सुदेशनाच्या आईनं त्या मुलींसोबत सुदेशनाला सरावासाठी माझ्याकडं पाठवलं. पहिल्याच वर्षी शालेय स्पर्धेत ती जिल्ह्यात पहिली आली. त्यानंतर विभागीय आणि राज्यस्तरावरही स्पर्धेत ती अव्वल ठरली. राष्ट्रीय स्पर्धेत ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली. मात्र, पहिल्याच खेलो इंडिया स्पर्धेत तिनं सुवर्णपदक पटकावलं. तेव्हापासून ती स्टार खेळाडू बनली.

ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी – देशासाठी खेळण्याची जिद्द बाळगून तिनं सर्व लक्ष सरावावर केंद्रीत केलं. एकही दिवस सराव चुकवला नाही. गावाला किंवा फिरायला जाणंदेखील टाळलं. त्यामुळेच सुदेशना आज देशातील सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे. मातीत सराव करूनदेखील सिंथेटिक ट्रॅकवर धावताना तिनं एकही चूक केली नाही, याचेदेखील प्रशिक्षकांनी कौतुक केलं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याची गुणवत्ता असणाऱ्या मुलांना सिंथेटिक ट्रॅक नसल्यानं मातीत सराव करून करावा लागत असल्याची खंत बळवंत बाबर यांनी व्यक्त केली. साताऱ्यात खूप मोठे नेते आहेत. त्यांनी सरकारच्या माध्यमातून सिंथेटिक ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रीय स्तरावर तब्बल 64 पदके जिंकली – खेलो इंडिया स्पर्धेत सलग सहा वर्षे सुवर्णपदक पटकावणारी सुदेशना शिवणकर ही देशातील एकमेव खेळाडू आहे. तैवान येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये (World Athletics Continental Tour) महिलांच्या 4×100 मीटर रिले स्पर्धेत तिनं सुवर्णपदक पटकावलं आहे. त्याचबरोबर झारखंडमधील रांची येथे झालेल्या 29 व्या सीनियर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 11.56 सेकंदांची वेळ नोंदवत सुदेशना ही देशातील सर्वात वेगवान धावपटू ठरली. या कामगिरीच्या जोरावर तिची जपानमधील आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुदेशनानं राष्ट्रीय स्तरावर तब्बल 64 पदके जिंकली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही 3 पदके पटकावली आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें