खरपी: खारपी गावात २००८ पासून सुरू असलेले डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हायस्कूल अचलपूर येथे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे स्थलांतर रद्द करून शाळा पूर्वीप्रमाणेच खरपी येथेच सुरू ठेवावी, या मागणीसाठी १२ सप्टेंबरपासून उर्दू माध्यमिक शाळा, खरपी येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
शाळा अचलपूरला गेल्यास खरपी आणि परिसरातील गावातील विद्यार्थिनींना लांबचा प्रवास करावा लागेल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यामुळे वाहतूक, सुरक्षितता आणि आर्थिक खर्चाचा प्रश्न निर्माण होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना रोज अचलपूरला जाणे कठीण होईल, ज्यामुळे अनेक मुलींचे शिक्षण सुटण्याची किंवा त्यात खंड पडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
शाळेत काही पायाभूत सुविधांची कमतरता असल्यास ती खारपी येथेच पूर्ण केली जावी, शाळा गावातून बाहेर नेण्याऐवजी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रमुख मागण्या:
- स्थलांतर रद्द करणे: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हायस्कूलचे अचलपूर येथील स्थलांतर त्वरित रद्द करून शाळा पूर्ववत खरपी येथेच चालवण्यात यावी.
- सुविधांची पूर्तता: खरपी येथील शाळेत सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
- सुरक्षा व वाहतूक सर्वेक्षण: विद्यार्थिनींचे शिक्षण, सुरक्षितता आणि प्रवासाच्या सुविधांचे सर्वेक्षण करण्यात यावे.
- पालक व विद्यार्थ्यांची सुनावणी: बाधित पालक आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन या निर्णयाची निष्पक्ष चौकशी केली जावी.
- कारवाईला स्थगिती: चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थलांतराच्या प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी.
मुलींचे शिक्षण हा आमचा हक्क
“कोणत्याही विद्यार्थिनीचे शिक्षण थांबता कामा नये. प्रशासनाने मुलींच्या भविष्याला प्राधान्य देऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा आणि शाळा खरपी येथेच सुरू ठेवावी,” अशी जोरदार मागणी पालकांनी केली आहे. हे धरणे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.








