अमरावती: डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (PDMMC) वतीने सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक श्री बलिदान राठी मूकबधिर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पुष्पक कॉलनी, साई नगर येथे एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई आणि विविध खेळांच्या साहित्याचे उत्साहात वाटप करण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमामुळे मूकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. उपस्थित डॉक्टर आणि इंटर्न्स यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांचा आनंद द्विगुणित केला.
वैद्यकीय पथकाचा प्रत्यक्ष सहभाग उपक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी डॉक्टर डॉ. जयसिंग पवार, डॉ. संकल्प खनके, डॉ. अश्विन अगरवाल, डॉ. कृष्णाकांत मुंदडा यांच्यासह इंटर्न्स दिव्या सलगर, श्रेया अगरवाल आणि अंकुश धुळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून योगदान दिले.
मार्गदर्शन व आभार हा आनंददायी उपक्रम अधिष्ठाता डॉ. देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन टेकाडे व प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोहोड यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली पार पडला. शाळा प्रशासन व शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या संपूर्ण पथकाचे मनःपूर्वक आभार मानले.








