मृत्यूशी झुंज, उपचार सुरू, वर्गमित्राविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
अमरावती : बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चच्या पायऱ्यांवरच मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एका तरुणाने १९ वर्षीय वर्गमैत्रिणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार केले. बडनेरा पोलिसांनी आरोपी नवीन मेघराज वानवाणी (१९, रा. सिंधी कॅम्प, बडनेरा) याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनुसार, मंगळवारी दुपारी प्रॅक्टिकल संपवून ती क्लासबाहेर येत असताना तिच्याच वर्गातील नवीनने तिला पायऱ्यांवरच मागोमाग गाठले. बॅगमध्ये आणलेल्या चाकूने त्याने तिच्या मानेवर दोन जीवघेणे वार केले. ती जिवाच्या आकांताने ओरडल्याने चौकीदार व विद्यार्थ्यांनी नवीनला पकडले आणि त्याला चोप दिला. प्राध्यापकांनी ही बाब बडनेरा पोलिसांना कळविली आणि प्राप्तीला बडनेरा रोडवरील खासगी रुग्णालयात हलविले. पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक आयुक्त संजय खताळे, ठाणेदार उरलागोंडावार, पोलिस निरीक्षक नीलेश करे यांच्यासह गुन्हे शाखाप्रमुख दिनेश दहातोंडे व अतुल वर यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीचे बयानदेखील नोंदविले आहे.
प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून हल्ला याप्रकरणी विद्यार्थिनीच्या भावाने बडनेरा पोलिसात तक्रार नोंदविली. त्या तक्रारीनुसार, नवीनने तिला प्रॅक्टिकल लिहून मागितले होते. त्यावर तिने नकार दिल्याने त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, बुधवारी त्याला न्यायालयासमोर उपस्थित करून पोलिस कोठडी मागितली जाणार आहे. त्यानंतर वास्तव उलगडू शकेल, अशी माहिती बडनेराचे ठाणेदार हणमंत उरलागोंडावार यांनी दिली.
_____________________________________________
डॉक्टरांनुसार ती तरुणी सध्या स्टेबल आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. भावाच्या तक्रारीवरून संशयित विद्यार्थ्यांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. तिच्या बयानानंतर आणखी उलगडा होऊ शकेल. प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून हा हल्ला झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हणमंत उरलागोंडावार, ठाणेदार, बडनेरा
‘त्या’ घटनेच्या आठवणी ताज्या राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रविनगर परिसरात ३ सप्टेंबर रोजी १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा गळा चिरून खून करण्यात आला. चार दिवसांपूर्वी नांदगाव खंडेश्वर येथे एका अभ्यासिकेत शिरून तरुणीच्या खुनाचा प्रयत्न झाला होता. आता या लागोपाठच्या घटनांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.








