अमरावती : काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या गणेडीवाल ले-आउट येथील निवासस्थानावरून एका ड्रोनने सोमवारी दुपारी १.४५ ते २ या वेळेत घिरट्या घातल्या. या ड्रोनद्वारे आपल्या घराचे व परिसराचे छायाचित्रण करण्यात आल्याचा गंभीर आरोप अॅड. यशोमती ठाकूर यांनी केला. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी याबाबत गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
केवळ गोपनीयतेचा भंग नव्हे, तर यामागे एखाद्या घातपाताची शक्यताही अॅड. ठाकूर यांनी तक्रारीतून व्यक्त केली. त्यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
अॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. सद्यस्थितीत तांत्रिक बाबींचा तपास सुरू असून, अद्यापपर्यंत कोणावरही गुन्हा किंवा एफआयआर दाखल करण्यात आला.
नसल्याची माहिती ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी दिली. अज्ञात ड्रोनच्या या फेऱ्यांमुळे राजकीय व स्थानिक वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. यामागील नेमका हेतू काय होता, याचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. पीडब्ल्यूडी वा अन्य यंत्रणेकडून सर्वेक्षण वा अन्य काही सुरू आहे का, याचा शोध घेतला असता, तसे निदर्शनास आले नाही. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असल्याचे अॅड. ठाकूर म्हणाल्या.
_____________________________________________
सोमवारी दुपारी मी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनात सहभागी झाले होते. घरी परतल्यानंतर ड्रोनने आपल्या घरावर घिरट्या घातल्याचे समजले. घरातील कर्मचारी व्हिडीओ घेणार तेवढ्यात तो ड्रोन निघून गेला. आमच्या जिवाला धोका असू शकतो. हा प्रकार अतिशय संशयास्पद आहे.
अॅड. यशोमती ठाकूर, माजी मंत्री








