z24news.in | अमरावती
यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही जिल्ह्यात शेती जमिनीची सुपीकता आणि पोषणस्थिती जाणून घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मृदा नमुना तपासणी मोहिमेची गती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने निश्चित केलेल्या १०,१०० नमुन्यांच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ ६,१०२ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली असून, हे एकूण लक्ष्याच्या सुमारे ६० टक्के आहे.
तालुकानिहाय कामगिरीमध्ये दर्यापूर तालुक्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ७२१ नमुन्यांच्या लक्ष्यापैकी ६५६ नमुने संकलित करून तपासणीसाठी पाठविले आहेत. तर चांदूर बाजार तालुका सर्वात मागे असून, ७२३ नमुन्यांच्या उद्दिष्टापैकी केवळ १०७ नमुन्यांचीच तपासणी पूर्ण झाली आहे.
इतर तालुक्यांमध्ये अमरावती येथे ४१०, भातकुली ५९१, चांदूर रेल्वे ५७३, धामणगाव रेल्वे ४५१, नांदगाव खंडेश्वर ५३४, मोर्शी ३५८, वरूड ३६९, तिवसा ४५९, अचलपूर ३५४, अंजनगाव सुर्जी ४७२, चिखलदरा ३९८ आणि धारणी येथे ३७० नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे.
मृदा तपासणीमुळे जमिनीतील उपलब्ध पोषक घटकांची माहिती मिळते. त्यानुसार शेतकऱ्यांना संतुलित खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जाते. मोहिमेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील मृदा नमुना तपासणीची स्थिती
| तालुका | लक्ष्य | पूर्णता |
|---|---|---|
| अमरावती | 721 | 410 |
| भातकुली | 721 | 591 |
| चांदूर रेल्वे | 721 | 573 |
| धामणगाव रेल्वे | 721 | 451 |
| नांदगाव खंडेश्वर | 723 | 534 |
| मोर्शी | 721 | 358 |
| वरूड | 721 | 369 |
| तिवसा | 721 | 459 |
| चांदूर बाजार | 723 | 107 |
| अचलपूर | 723 | 354 |
| अंजनगाव सुर्जी | 721 | 472 |
| दर्यापूर | 721 | 656 |
| चिखलदरा | 721 | 398 |
| धारणी | 721 | 370 |
| एकूण | 10,100 | 6,102 |









