परीक्षेसाठी ‘नीट’ तपासणी; बेल्ट, बूटही बाहेर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली ‘नीट’ परीक्षा रविवारी जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रावर पार पडली. यावेळी ५,८४२ विद्यार्थी परीक्षेला हजर होते. परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांकडील मोबाइलसह इतर गॅजेट काढून घेण्यात आले. त्याचबरोबर बूट काढण्यास लावून तपासणी करण्यात आली तसेच बेल्टही परीक्षा केंद्राबाहेरच काढून घेण्यात आले, तर विद्यार्थिनींनादेखील त्यांच्या गळ्यातील, कानातील तसेच नाकातील दागदागिने काढल्यानंतरच त्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षा पास करावी लागते.

रविवारी दुपारी २ ते ५.२० यावेळेत ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ६००४ विद्यार्थी पात्र होते. त्यांच्यासाठी जवळपास १२ परीक्षा केंद्रे होती. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंतच वेळ दिली होती. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या तापत्या उन्हामध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लांबच लांब रांग परीक्षा केंद्रावर पहायला मिळाली तसेच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कठीण प्रक्रियेला सामोरे जावे लागले. यावेळी सर्वच विद्यार्थांची कडक तपासणी करीत त्यांच्याकडील मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक घड्याळ तसेच इतर गॅजेट काढून घेण्यात आले. जे विद्यार्थी बूट घालून आले होते, त्यांचे बूट काढून पूर्ण तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांचे बेल्टही काढून ठेवण्यात आले.

अमरावती शहरात होती १० केंद्रे नीट परीक्षेसाठी शहरात दहा केंद्रे होती. यात स्कूल ऑफ स्कॉलर्स, सिपना इंजिनिअरिंग कॉलेज, राम मेघे कॉलेज, इंडो पब्लिक स्कूल, के. के. कैंबरीज इंटरनॅशनल स्कूल, पी. आर. पोटे इंटरनॅशनल स्कूल, व्हीएमव्ही कॉलेज, विमलाबाई देशमुख कॉलेज, श्री शिवाजी सायन्स कॉलेज, मनीबाई गुजराती या केंद्राचा समावेश होता.

जिल्ह्यात नीट परीक्षेसाठी एकूण १२ केंद्र होते. या केंद्रावर ६,००४ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होते. यापैकी ५,८४२ विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर राहिले. परीक्षा केंद्रावर कोणताही अनूचित प्रकार घडला नाही.

– सुरेश लकडे,(नीट परीक्षा समन्वयक)

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!