अमरावतीत पावसाचा अंदाज, मात्र पाऊसच नाही; आता 48 तास महत्त्वाचे
अमरावती – पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, ढगाळ वातावरण आणि काहीसा रिमझिम पाऊस वगळता विशेष असा पाऊस कुठेही झाला नाही. आता केवळ दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. 9 जुलैनंतर मात्र विदर्भात पावसाची तीव्रता अतिशय कमी राहणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
पावसाची प्रतीक्षाच – जून महिन्यात हवा तसा पाऊस झाला नाही. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला असताना देखील अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद कुठेही झालेले नाही. असं असताना 10 जुलैपर्यंत पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याच्या या अंदाजानुसार, अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरणीची कामं आटोपली. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना सात आणि आठ जुलैला दमदार पाऊस बरसणार, अशी हवामान खात्याच्या अंदाजानुसार अपेक्षा होती. आज सात जुलैला मात्र जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस बरसला नाही. पुढील 48 तासात पाऊस बरसण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
सकाळपासून ढगाळ वातावरण – मंगळवारी पहाटे तीन वाजता अमरावती शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी पाच वाजल्यापासून मात्र पावसाचा अधूनमधून शिरकाव येत आहे. सकाळपासूनच अमरावती शहरात ढगाळ वातावरण आणि गार वारा वाहतो आहे. मुसळधार पाऊस कोसळेल, असं वातावरण भासत असलं तरी विशेष असा पाऊस अमरावती शहरात बरसला नाही.
मेळघाटातही पाऊस झाला नाही – जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. धारणी आणि चिखलदरा या सातपुडा पर्वत रांगेत असणाऱ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस अद्याप बरसलेला नाही. मंगळवारी सकाळी धारणी आणि चिखलदरा या दोन्ही शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र, अपेक्षेप्रमाणे मेळघाटातही पाऊस झाला नाही. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या वरुड आणि मोर्शी तालुक्याची देखील परिस्थिती अशीच आहे. या दोन्ही तालुक्यात देखील अद्याप पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.
सात तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस – जिल्ह्यातील एकूण 12 तालुक्यांपैकी भातकुली, अचलपूर, धामणगाव रेल्वे, अमरावती, वरुड, चांदुर रेल्वे आणि चिखलदरा या तालुक्यात पावसाची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
गुरुवारपासून पावसाची तीव्रता कमी – मंगळवारी अमरावती जिल्ह्यात मुसळधार ते जोरदार पाऊस बरसेल, असा ऑरेंज अलर्ट आहे. मात्र, आज विशेष असा पाऊस बरसला नाही. आता मंगळवारी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. जर आजच्यासारखाच उद्या देखील पाऊस बरसला नाही तर परिस्थिती थोडीशी कठीण होईल. 9 जुलैनंतर अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात पावसाची तीव्रता अतिशय कमी राहील, असं श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाचे माजी प्रमुख प्रा. अनिल बंड यांनी सांगितलं.









