पुण्यात आणि घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळं खडकवासला धरणातून मुठा नदीत 22,880 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळं सिंहगड रस्त्यावरील एकता नगरमधील अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.
पुणे : जून महिन्याच्या अखेरपर्यंत पावसानं राज्यात दडी मारली होती. पण त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पुण्यासह राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात मागील 48 तासापासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस होत आहे. तसंच घाट माथ्यावर देखील मुसळधार पाऊस होत असल्यामुळं खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 22,880 क्युसेक विसर्ग वाढवल्यामुळं पुण्यातील एकता नगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचा पाणी शिरलं आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी बुधवारी (दि.8) पहाटे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर व विठ्ठल नगर या संभाव्य बाधित परिसरांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महापौरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसंच प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीनं राबवण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
प्रशासनाला सहकार्य करावं : “या प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनामार्फत आवश्यक सूचना दिल्या. नदीपात्रालगत तसंच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं. प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं आणि आवश्यकता भासल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं,” असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं.









