स्वच्छतेच्या मुद्यावर बोट, संपूर्ण शहरभर तपासणी मोहीम, कारवाई तीव्र
अमरावती : शहरातील गाडगेनगर भागात अनेक वर्षांपासून शेगाव कचोरी निर्मिती व विक्री करणाऱ्या शांती रिफ्रेशमेंटवर अन्न व औषध प्रशासनाची अखेर वक्रदृष्टी पडली. तेथील अस्वच्छतेवर बोट ठेवत एफडीएने या प्रतिष्ठानाचा खाद्यपदार्थ विक्री परवाना निलंबित केला. याशिवाय शहर व परतवाडा येथील बेकरींमध्ये आढळलेल्या विनालेबल ब्रेडचा एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. कुठलिही नोंद नसलेला हा ब्रेड मध्यप्रदेशातून मागविला जातो, हे विशेष.
एफडीएच्या तपासणीत शांती रिफ्रेशमेंट या प्रतिष्ठानात तयार होणारे खाद्यपदार्थ अतिशय अस्वच्छ वातावरणात बनविले जात असल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उशिरा रात्री कारवाई करत प्रतिष्ठानाचा परवाना निलंबित करण्यात आला. शांती रिफ्रेशमेंटमध्ये दररोज मोठ्या संख्येने तरुण-तरुणींसह नागरिकांची गर्दी होत असते. मात्र, अन्न तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याचे तपासणीत समोर आल्यानंतर एफडीएने ही कठोर कारवाई केली. त्यामुळे आता हे प्रतिष्ठान एफडीएच्या पूर्वपरवानीशिवाय खाद्यपदार्थ विक्री करू शकणार नाही.
सातत्याने तपासणी एफडीएचे आयुक्तपद सांभाळताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांची अधिनिस्थ यंत्रणादेखील चांगलीच कामाला लागली आहे. संपूर्ण शहर व जिल्ह्यात सातत्यपूर्ण कारवाई केली जात आहे.
एफडीए नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांवर लक्ष ठेवून आहे. शहरात मध्यप्रदेशातून येणारी विनालेबल ब्रेड जप्त करण्यात आली. गाडगेनगर भागातील शांती रिफ्रेशमेंटचा परवाना रद्द करण्यात आला.
गजानन गोरे, अन्न सुरक्षा अधिकारी.
विना लेबल ब्रेड एमपीतून अमरावती, परतवाड्यात
वलगाव रोड परिसरातील न्यू महाराष्ट्र बेकरी व परवाड्यातील न्यू सागर बेकरी येथे मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात विना लेबलची ब्रेड विक्रीकरिता येत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. बेकरीची तपासणी करीत सुमारे एक लाख रुपये किमतीचे ब्रेड जप्त केले. अमरावती येथून २४ हजार रुपये किमतीची ब्रेड तर परतवाडा येथून ८४ हजार रूपये किमतीची ब्रेड जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ब्रेडच्या पॅकिंग वर कुढल्याही प्रकारची माहीती असलेले लेबल आढळून आले नाही, ब्रेड मध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून ही कार्यवाही करण्यात आल्याचे एफडीए प्रशासनाने सांगितले.









