अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे केंद्र सरकारविरोधात धिक्कार आंदोलन
अमरावती: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा, जयस्तंभ चौक येथे जोरदार धिक्कार आंदोलन करण्यात आले. “धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो… विद्यार्थीयोंको न्याय दो… नरेंद्र मोदी हटाव, देश बचाव” अशा संतप्त आणि जोशपूर्ण घोषणांनी जयस्तंभ चौक आणि संपूर्ण मार्केट परिसर दणाणून गेला.
हे आंदोलन अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावतयांच्या नेतृत्वात पार पडले. या प्रसंगी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुखआणि महानगरपालिका विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांवर आघात!
आंदोलनादरम्यान नेत्यांनी केंद्र सरकारच्या विद्यार्थीविरोधी भूमिकेवर तीव्र शब्दप्रहार केले. जंतर-मंतरवर लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच या घटनेचा निषेध करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांना अटक करण्याच्या कारवाईचा तीव्र धिक्कार करत, हा लोकशाही मूल्यांवर थेट आघात असल्याचा आरोप नेत्यांनी केला.
पायदळ मोर्चा व परिसर दणाणला
जयस्तंभ चौक येथे निदर्शने केल्यानंतर संपूर्ण मार्केट परिसरात भव्य पायदळ मोर्चा काढण्यात आला.
“मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी”
“विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या धोरणांचा निषेध असो”
“लोकशाही वाचवा – विद्यार्थ्यांना न्याय द्या”
यांसारख्या घोषणांनी संपूर्ण परिसर गूंजला होता.
प्रमुख नेत्यांची भूमिका: बबलू शेखावत (शहराध्यक्ष)“विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही केली जात असेल, तर काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीला घातक आहे.”
डॉ. सुनील देशमुख (माजी पालकमंत्री): “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने संवेदनशील भूमिका घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.”
विलास इंगोले (विरोधी पक्षनेते, मपा): “विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने पारदर्शकता आणि उत्तरदायित्व दाखवणे गरजेचे असून लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांचा सन्मान राखला गेला पाहिजे.
”काँग्रेसच्या सर्व आघाड्यांची उपस्थिती
या आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवक काँग्रेस, एनएसयूआय (NSUI), महिला काँग्रेस, सेवादल, ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक आणि सोशल मीडिया विभागाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, संजय वाघ, सलीम मिरावले, अशोक डोंगरे, अर्चना आत्राम, सुजाता झाडे, गुड्डू हमीद, मोहम्मद रेहान (बल्ला भाई), प्रशांत महल्ले, संजय शिरभाते, फिरोज खान, सुरेश रतावा यांच्यासह असंख्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा संघर्ष भविष्यात अधिक तीव्र केला जाईल आणि काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने लढा सुरूच ठेवेल, असा इशारा देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला.