Edition

तुकाराम मुंढेंच्या धाडसत्राचा ‘गोकुळ’ला फायदा? हसन मुश्रीफांचे मिश्कील वक्तव्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

“तुकाराम मुंडे काही वर्षे FDA मध्ये राहिले, तर लोकांचे आयुर्मान वाढेल”; आश्रमशाळांमधील निकृष्ट जेवणाबाबतही कारवाईचे संकेत

 

 

नंदुरबार – तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर राज्यभर सुरू असलेल्या धाडसत्रामुळे कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची चलती झाल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. राज्यात भेसळीच्या दुधामुळे दूध उत्पादनात २५ टक्क्यांनी घट झाल्याने गोकुळच्या दुधाची मागणी वाढल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे एकंदरीत तुकाराम मुंढे ‘गोकुळला पावले’, असे चित्र असल्याचे त्यांनी मिश्कीलपणे नमूद केले.

 

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार जिल्ह्यात विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी गेल्या महिनाभरात समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेली विषबाधा तसेच आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. हा विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि जीवनमानाचा प्रश्न असल्याने तुकाराम मुंढे यांनी याकडे लक्ष घालावे, तसेच याबाबत त्यांच्याशी बोलून तातडीने कारवाई करण्यास सांगणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

यावेळी बोलताना मुंढेंच्या कारवाईमुळे राज्यातील दूध उत्पादनात २५ टक्क्यांची घट झाली असून त्याचा फायदा मात्र गोकुळला झाल्याचे मिश्कील भाष्यही त्यांनी केले. सध्या पनीरही दिसत नाही. त्यामुळे किती भेसळ होत होती, हे लक्षात येते. काल रेल्वेने येताना काही लोक भेटले. त्यांनी तुकाराम मुंढे यांना काही वर्षे अन्न व औषध प्रशासन विभागात ठेवले, तर लोकांचे आयुर्मान पाच वर्षांनी वाढेल, असे सांगितल्याचेही मुश्रीफ म्हणाले. लोकांचे आयुर्मान पाच नव्हे, तर दहा वर्षांनी वाढले पाहिजे. तुकाराम मुंढे यांच्यासारखे सर्व अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. निदान जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

‘अर्थखात्याबाबत भाजप दिलेला शब्द पाळेल’

राज्याचे अर्थ खाते आमच्या पक्षालाच मिळेल. यासाठी राष्ट्रवादीची बैठक झाली असून लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष असल्याने अर्थ खात्याबाबत दिलेला शब्द निश्चितच पाळला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्थ खाते मिळण्याबाबत मित्रपक्षांमध्ये काही विरोध असेल, तरी तसे करून चालणार नाही. जे ठरले आहे, त्याप्रमाणेच झाले पाहिजे. आम्ही काही वेगळे मागत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष एकदिलाने काम करत असून पक्षात मतभेद असल्याच्या चर्चांना कोणताही अर्थ नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

 

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें