अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; सोमवारपासून उमेदवारी अर्जास सुरुवात
अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध असला, तरी मतपत्रिकेवर निवडणूक चिन्ह राहणार नाही, शिवाय उमेदवारांनी किती खर्च करावा, यासाठी खर्च मर्यादेचे बंधनही नाही, त्यामुळे ही निवडणूक जरा हटकेच ठरत आहे. किंबहुना याच बाबी उमेदवारांच्या अन् मतदारांच्या पथ्थ्यावर पडणार आहे.
सोमवार २५ मे रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील व या दिवसापासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. या पार्श्वभूमीवर २२६ स्त्री व २२५ पुरुष असे एकूण ४५३ मतदारांची अंतिम मतदार यादी निवडणूक विभागाद्वारा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये सात उपविभागांत ४५३ मतदार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या अनुषंगाने भरारी पथक स्थापित करण्यात आले आहे. उमेदवारी खर्च नसल्याने फारशा तक्रारी नसल्या, तरी आमिष, पैशांचे वाटप आदी प्रकारांवर पथक लक्ष ठेऊन राहणार आहे.
केवळ सात मतदान पथके या निवडणुकीत केवळ उपविभागीय स्तरावर सात मतदान केंद्र व मतदारसंख्या देखील कमी असल्याने केवळ सात मतदान पेटीत प्रक्रिया होईल. प्रत्येक मतदान पथकात एक पोलिस कर्मचाऱ्यासह सहा कर्मचारी राहणार आहेत. त्यामुळे ४२ कर्मचारी व १० टक्के राखीव, अशा एकूण ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया येथील नियोजन भवनात आटोपणार आहे.
आचारसंहिता कक्षाचे कामकाज सुरू अपर जिल्हाधिकारी प्रमुख असलेल्या आचारसंहिता कक्षाचे कामकाज सुरू झालेले आहे. याशिवाय तहसील स्तरावरदेखील आचारसंहिता कक्ष राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
‘ए-बी’ फार्म आवश्यक, मात्र पक्षाचे चिन्ह नाही या निवडणुकीत अधिकृत उमेदवार असल्याबाबत राजकीय पक्षाचा ‘ए-बी’ फार्म आवश्यक राहणार आहे. व उमेदवारी अर्ज सादर करण्याचे अखेरच्या दिवसापर्यंत दाखल करता येणार आहे. मात्र, या निवडणुकीत उमेदवारी चिन्ह राहणार नसल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी दिली.
गत निवडणुकीची स्थिती
अनिल माधोगहिया १७
प्रवीण पोटे ४५८
नोटाला मते ३
रिजेक्टेड मते १०
वैध मते ४७५









