Edition

नव्या शैक्षणिक वर्षाचे दमदार स्वागत; महापालिकेच्या कार्यप्रेरणा शिबिरातून शिक्षकांना नवसंजीवनी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी भव्य कार्यप्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्तावाढ, अध्यापनातील नावीन्य, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती आणि शिक्षकांची प्रेरणा अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती अॅड. प्रीतीताई हर्षल रेवणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते झाले. यावेळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, उपआयुक्त नरेंद्र वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांची भूमिका ही केवळ ज्ञानदानापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्याची मोठी सामाजिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थेत सातत्याने नवे प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी अध्यापन पद्धती स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शिबिरात शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी आणि मानवी नवलानी यांनी शिक्षकांना सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक मानसिकता, विद्यार्थ्यांशी संवाद कौशल्य, मूल्याधिष्ठित शिक्षण, नवकल्पनांचा स्वीकार तसेच शिक्षकांनी स्वतःमध्ये सातत्याने ज्ञानवृद्धी करण्याची आवश्यकता यावर त्यांनी विविध उदाहरणांसह मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांना उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यप्रेरणा शिबिरामुळे नवीन शैक्षणिक वर्षात अधिक उत्साह, नवचैतन्य आणि सकारात्मक दृष्टीकोनातून काम करण्याची प्रेरणा शिक्षकांना मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया अधिक मजबूत करण्याच्या दिशेने अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजांची जाणीव ठेवत शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी आणि शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे कार्यप्रेरणा शिबिर नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सकारात्मक ऊर्जा देणारे ठरल्याचे उपस्थित शिक्षकांनी नमूद केले.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें