सचिन इंगळे प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी : अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात अंजनगाव सुर्जी पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत प्रभावी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी देशी दारूची मोठी खेप जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी नियमित गस्त घालत असताना त्यांना एका गोपनीय माहितीदारामार्फत महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली. अंजनगाव सुर्जी येथून परतवाडा मार्गाकडे एक व्यक्ती मोटारसायकलद्वारे मोठ्या प्रमाणात देशी दारू वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी पद्मश्री हॉटेलसमोरील कच्च्या रस्त्यावर, जय दुर्गा टायर वर्क्सलगत रणनीतीपूर्वक सापळा रचला. काही वेळातच संशयित व्यक्ती तेथे येताच पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली. त्याने आपले नाव योगेश ज्ञानदेवराव वानखडे (वय ४२), रा. गावंडगाव, ता. अंजनगाव सुर्जी असे सांगितले.
यानंतर मोटारसायकलवर ठेवलेल्या दोन प्लास्टिकच्या पोत्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गोल्डन संत्रा कंपनीच्या ९० मिलिलिटर क्षमतेच्या देशी दारूच्या तब्बल ६०० सीलबंद पाऊच आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एमएच-२७-बीएम-५०४५ क्रमांकाची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल, किंमत सुमारे ८५ हजार रुपये, ही देखील जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला.
या प्रकरणी आरोपी योगेश वानखडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (अ) आणि ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोडेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जयसिंग चव्हाण तसेच पोलीस कर्मचारी रवि राठोड, आकाश रंगारी, अमित घाटे, शुभम मारकंड, मोहसिन पठाण, प्रमोद चव्हाण आणि नितीन इंगळे यांनी कारवाई यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.









