
चिखलदरा : मागील पाच दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. सर्वत्र पारा चढला असताना विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर रविवारी सायंकाळी ४ वाजता ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले गेले. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांनाही गरम वाफेचा सामना करावा लागला. सर्वत्र कमालीचे तापमान वाढले आहे. वीकेंडला सुट्टीचे दिवस पाहता, पर्यटक नजीकचे थंड हवेचे ठिकाण शोधतात. विदर्भातील एकमेव पर्यटनस्थळ असलेले चिखलदरा आता तापू लागले आहे.
दोन दिवसांआड पाणी चिखलदरा पर्यटनस्थळावर पिण्याचे पाण्याची ओरड फेब्रुवारी महिना लागताच सुरू होऊन जाते. बागलिंगा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत पर्यटन स्थळाच्या घशाला कोरडच पडलेली राहणार आहे. येथील कालापानी, सक्कर तलावासह सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी येथून बोअरवेलद्वारे पाण्याचा पुरवठा होतो. परंतु, अवघ्या पाच हजार लोकसंख्येसह पर्यटकांना पिण्याचे पाणी पुरवण्याची क्षमता या तलावांमध्ये नाही. परिणामी, मागील १५ वर्षापासून चिखलदराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिगंभीर आहे.
टँकरवाले भैया… एकमेव स्रोत चिखलदरा येथील हॉटेल व्यवसायिकांसह शासकीय विश्रामगृहाला पिण्याचे पाणी वापरण्यासाठी टँकरचा सहारा घ्यावा लागतो. ८०० ते हजार रुपये ट्रिपप्रमाणे पिण्याचे पाणी साठवून ठेवण्याची नामुष्की गेल्या अनेक वर्षापासून पर्यटनस्थळावरील व्यावसायिकांवर आहे, तर दुसरीकडे शहापूर येथील पिण्याचे पाणी विकणारे दुकानदार गलेलठ्ठ होत असताना शासनातर्फे बोएरवेल विहिरी अधिग्रहित केल्या गेल्या नसल्याची शोकांतिका आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






