Edition

मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; विदर्भातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, अनेक भागांतील शाळांना सुट्टी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई महानगर प्रदेश आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागानं मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी दुपारपर्यंत रेड अलर्ट जारी केला.

 

 

मुंबई : राज्यभर मान्सूननं पुन्हा जोर धरला असून कोकण, मुंबई महानगर प्रदेश आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागानं मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचवेळी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट : भारतीय हवामान विभागानं आज सकाळी 7.45 वाजता जारी केलेल्या ‘नाऊकास्ट वॉर्निंग’मध्ये पुढील तीन तासांसाठी मुंबई, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या तीव्र सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं, सखल भाग, नदी-नाले आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात विशेष सतर्कता बाळगावी. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

 

 

पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत : गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला. सायन, दादर, हिंदमाता, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, घाटकोपर, कांदिवली, मालाड आणि बोरीवलीसह अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलं. त्यामुळे सकाळच्या कार्यालयीन वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रात्रभर पडलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या.

 

जुन्या बांधकामांचे किरकोळ भाग कोसळले : काही ठिकाणी भिंतींचे आणि जुन्या बांधकामांचे किरकोळ भागही कोसळले. बृहन्मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून अडथळे दूर करण्याचं काम सुरू केलं. पावसाशी संबंधित काही दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडून वेळोवेळी अद्ययावत करण्यात येत आहे. जोरदार पावसाचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही दिसून आला. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील काही लोकल गाड्या विलंबानं धावत असल्यानं प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. काही ठिकाणी बससेवेवरही परिणाम झाला, तर सखल भागातील रस्ते तात्पुरते बंद ठेवावे लागले.

 

पावसामुळे शाळांना सुट्टी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मुंबई, ठाणे, पालघर तसेच अतिवृष्टीचा इशारा असलेल्या इतर काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनानं शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार सुट्टी देण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत कोकण किनारपट्टी, मुंबई महानगर प्रदेश आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी नद्या आणि नाले दुथडी भरून वाहण्याचा तसेच डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका असल्यानं प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन : राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. पाण्यानं भरलेले रस्ते आणि पूल ओलांडणं टाळण्याचं, झाडं व कमकुवत इमारतींपासून दूर राहण्याचे तसेच केवळ अधिकृत हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मच्छीमारांनाही समुद्र खवळलेला असल्यानं पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीनं मदत उपलब्ध करून देण्यासाठी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत. परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून पुढील इशारे आणि प्रशासनाकडून आवश्यक ते निर्णय जाहीर केले जाणार आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें