Edition

विनानंबरचा टिप्पर ‘नो एन्ट्री’त अन् गौण खनिजाची तस्करीही ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

कालबाह्य फिटनेस : उड्डाणपुलावरील अपघातातील फरारी चालक अटक

अमरावती : राजापेठ उड्डाणपुलावर २८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास एका विनानंबरच्या टिप्परने दिलेल्या धडकेत अपघातात दोघींचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर वाहन जागीच सोडून पळून गेलेल्या टिप्पर चालकाला राजापेठ पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत त्याच्या घरातूनच बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी आरोपी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब अख्तर शेख अन्सार (२४, रा. नवसारी) असे अटक टिप्पर चालक मालकाचे नाव आहे.

राजापेठ उड्डाणपुलाच्या प्रारंभी झालेल्या या अपघातात गौणखनिज वाहून नेणाऱ्या टिप्परच्या धडकेत ई मोपेडवर असलेल्या गौरी व तिची मावशी हर्षा यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे अवजड वाहनांसाठी शहरात पहाटे ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत नो एन्ट्री असताना तो विनाक्रमांकाचा टिप्पर चक्क गौणखनिजाची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.

 

दीड वर्षांपासून विना नंबरप्लेटचा खेळ सुरू तपासादरम्यान या गुन्ह्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. आरोपी चालकाकडे टिप्परची कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्याने हा टिप्पर दीड दोन वर्षांअधी लातूर येथून खरेदी केला असून, अद्याप कागदपत्रांमध्ये मालकी हक्काचा बदल केला नसल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, घेतल्यापासून हा टिप्पर विनाक्रमांकानेच शहरातून बिनदिक्कत धावत होता. इतकेच नव्हे तर, त्या टिप्परचे फिटनेस प्रमाणपत्र देखील कालबाह्य झाले होते. कागदपत्र नसताना आणि वाहन अनधिकृत असतानाही शहरातून गौण खनिजाची अवैध वाहतूक केली जात होती.

इंजिन व चेसिस नंबरवरून लागला शोध घटनास्थळावरून टिप्पर चालक फरार झाला होता. मात्र, राजापेठ पोलिसांनी हार न मानता टिप्परच्या इंजिन नंबर व चेसिस नंबरवरून वाहन क्रमांक शोधून काढला. तपासणीत हा टिप्पर (क्र. MH 24 J 8637) असल्याचे समोर आले. पोलिसांनी जलद चक्रे फिरवत शोध घेतला असता, शोएब अख्तर शेख अन्सार (वय २४ वर्षे, रा. नवसारी, अमरावती) हाच या टिप्परचा चालक-मालक असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला त्याच्या घरूनच अटक केली. राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण, पोलिस निरीक्षक उमेश मुंडे, सपोनि सचिन पवार, नितीन शिंदे आणि पोउपनि रोशन चटे व अंमलदार मनीष करपे, रवि लिखितकर, अमोल खंडेझोड यांनी ही कारवाई केली आहे.

१५० वाहतूक अंमलदारांना का दिसला नाही टिप्पर ?

तो अवजड ट्रक शहरात चौकाचौकात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांना का दिसला नाही. दिसला असेल तर तो विनाक्रमांकाचा असतानाही त्याला अटकाव का करण्यात आला नाही की त्याला जाणूनबुजून ‘फॉलो ऑन’ देण्यात आला, असे विविध प्रश्न या भीषण अपघाताच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. अख्खी वाहतूक पोलिस यंत्रणाच या अपघाताच्या निमित्ताने संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें