सिपना, मेघा नदीला पूर; धारणीने पहिल्यांदा अनुभवला पूर, घटांग-कुकरू मार्गावर दरड कोसळली
धारणी/चिखलदरा : मेळघाटाने यंदा पहिल्यांदा पूर अनुभवला. सिपना नदीला गुरुवारी सकाळी पूर आल्यामुळे धारणी तालुक्यातील उतावलीच्या पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे जवळपास १५ ते २० गावांच्या संपर्क मुख्यालयापासून तुटला होता. दुसरीकडे दिया गावाजवळून वाहणाऱ्या याच नदीवर पुलावरून पाणी वाहत असल्याने २५ ते ३० गावांचा संपर्क तुटला होता. चिखलदरा व सेमाडोह मंडळात गुरुवारी सकाळी ११ पर्यंत १३३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गुरुवारी पहाटे २ पासून संततधार आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. संततधार पावसामुळे एकीकडे जनजीवन विस्कळीत झाले असताना, दुसरीकडे खरीप पिकांना जीवनदान मिळाले आहे. उतावली येथे नदीवर आलेल्या पुरामुळे या भागातील पोहरा, चाकर्दा, गोबरकहू, कारादा, पाटिया, आडनादा आदी गावांचा धारणी मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. दिया येथे नदीवरील पुरामुळे निरगुडी, उकूपाटी, धारणमहू, ढाकरमल, चेथर, केकदाबोड, चटवाबोड, बैरागड, काटाकुंभ, भोंडीलावा, कुटुंगा, रंगूबेली आदी गावांचा मुख्यालयाशी तब्बल १२ वाजेपर्यंत संपर्क तुटला होता.
११२ मिलिमीटर, मात्र दोन दिवसांत नळ चिखलदरा पर्यटनस्थळावर बुधवारी ११२ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी जून आणि जुलै महिन्यात एकूण ६९६ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र ती ५७२ मिमी आहे. तीन दिवसांपासून मेळघाटात दमदार पावसाने हजेरी लावली. चिखलदरा पर्यटनस्थळावर दाट धुके आणि पर्यटकांची गर्दी आहे. तीन दिवसांच्या पावसातच सक्कर तलावामध्ये ११ फूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शहराला चार दिवसांआड पाणीपुरवठा दोन दिवसांवर करण्यात आला आहे. पावसाची हजेरी राहिल्यास तो दररोज होण्याची शक्यता आहे.
जारीदा-मेहरिआम मार्गावर रस्ता गेला वाहून चिखलदरा तालुक्यातील घटांग-कुकरू मार्गावर दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला आहे. जारीदा-मेहरिआम मार्गावर रस्ताच वाहून गेल्याने अनेक प्रवासी वाहन आणि नागरिकांची ये-जा करण्यासाठी कसरत होत आहे.
तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने सिपना नदीला सकाळी तीन ते चार तास पूर होता. त्यानंतर तो ओसरला. ठप्प झालेली वाहतूक आता सुरळीत आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
प्रदीप शेवाळे, तहसीलदार, धारणी जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह पुन्हा पावसाला सुरुवात.
पोलिस, महसूल विभाग घटनास्थळी, काटेकोर लक्ष पोलिस, महसूल विभाग घटनास्थळी पूर परिस्थितीवर महसूल व स्थानिक पोलिस प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. तहसीलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसीलदार राजेश माळी, सहायक पोलिस निरीक्षक सलीम चव्हाण यांच्यासह पोलिस तैनात करण्यात आले होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी काही गावांचा संपर्क खंडित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान नदी-नाले व विविध प्रवाहांच्या पात्रात वा काठावर न जाण्याचा तसेच संकटाच्या वेळी प्रशासनाकडे मदतीचे आवाहन मेळघाटातील नागरिकांना करण्यात आले आहे.








