D. Y. Patil Passed Away: पद्मश्री डॉ. डी वाय पाटील
यांचे कोल्हापुरात निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Dr. Dnyandeo Yashwantrao Patil Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूरमध्ये निधन झाले. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारी रात्री वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. बुधवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
डॉ. डी वाय पाटील यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे काम आहे. त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. त्यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.
डी. वाय. पाटील यांनी राज्यात मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्रात व इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली. राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
डी. वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले.








