नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींविरुद्ध आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जवळपास 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ शेअर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर तर काही मिनिटांनंतरच सोनम वांगचुक (Sonam Wangchuk Protest) यांनी आपले उपोषण संपवले. नीट पेपरफुटी प्रकरणातील (NEET Exam Paper Leak) दोषींविरुद्ध आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जवळपास 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. उपोषण थांबवण्याची माहिती स्वत: सोनम वांगचुक यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.
आत्ताच, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह, तसेच लेह-लडाखच्या सर्वोच्च समितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत, मी 26 दिवसांनंतर अखेर माझे उपोषण सोडले. यापूर्वी, विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी माझी भेट घेतली होती किंवा मला पत्र लिहून उपोषण सोडण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारसोबत अनेक अटींवर दीर्घ चर्चा केल्यानंतर आणि देशातील संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. मी लवकरच एका वेगळ्या व्हिडीओमध्ये या अटींबद्दल सविस्तर माहिती देईन. यादरम्यान, मी तुम्हा सर्वांना अत्यंत सतर्क राहण्याचे आणि कुठेही होणारी हिंसा टाळण्याचे आवाहन करतो, असं सोनम वांगचुक यांनी सांगितले.
केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या कोणत्या अटी मान्य केल्या? (Which of Sonam Wangchuk demands did the Government accept?)
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह, यांनी रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत याची माहिती दिली. जेपी नड्डा यांनी सोनम वांगचुक यांना सरकारचे संपूर्ण आश्वासन वाचून दाखवले. यामध्ये केंद्र सरकारने 3 महत्वाच्या अटी मान्य केल्या.
- 20 जुलै रोजी शांततेने आंदोलन करून संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही.
- परीक्षेसंदर्भात पेपरफुटी आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे.
- नीट (NEET) पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचाही विचार केला जाईल.
सोनम वांगचुक यांनी सांगितलं उपोषण मागे घेण्यामागचं कारण- (Why Sonam Wangchuk Hunger Strike End?)
केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, जंतरमंतर येथे जवळपास महिनाभर आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या समर्थकांशी सरकारची अनेकदा चर्चा होऊनही त्यातून कोणताही तोडगा निघाला नव्हता. मात्र, आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, अशा आश्वासनांसह करण्यात आलेल्या एका पुढाकारानंतर वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक अटींवर दीर्घ चर्चा केल्यानंतर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला. (Sonam Wangchuk Protest Marathi News)
सोनम वांगचुक 26 दिवसांपासून होते उपोषणावर- (Sonam Wangchuk)
सोनम वांगचुक यांनी 28 जून रोजी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले होते. विविध स्पर्धा परीक्षांमधील नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या आणि शिक्षण व्यवस्थेत उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या विद्यार्थी व तरुणांच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनादरम्यान, सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व निश्चित करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. 18 जुलै रोजी (21 व्या दिवशी), सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावू लागली. डॉक्टरांचा सल्ला आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेण्यास वांगचुक यांनीही आक्षेप घेतला होता. मात्र 24 जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
एकीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम- (CJP Protest Jantar Mantar)
एकीकडे सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. 26 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला असून आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. सोनम सर, आपल्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण संपूर्ण देशाच्या विवेकाला जागृत केले. आपले जीवन या देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे, असं अभिजीत दीपके म्हणाले. तसेच कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर येथे सुरू असलेले शांततापूर्ण आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत सुरूच राहणार आहे, असंही अभिजीत दीपके यांनी सांगितले.









