अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सेवानिवृत्त १५० अधिकारी व कर्मचारी सेवा देत आहेत. अशातच, ३० जुलै रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत वर्ग १ व २मधील निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशिष्ट कामांसाठी, तसेच वर्ग ३ व ४ मधील तांत्रिक कामांसाठी मानधनावर सेवा घेण्यासंदर्भातील प्रारूप विनियम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
एका बाजूला सेवानिवृत्तांची संख्या कमी करण्याची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे त्यांच्या मानधनात तब्बल ८ ते १३ हजारांची वाढ करण्याचा प्रस्ताव समोर आल्याने विद्यापीठाच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यापीठातील सेवानिवृत्तांची वाढती संख्या आणि त्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी १२ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. एच. आर. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेने एक विशेष समिती स्थापन केली होती.
तब्बल १४० टक्के वाढ कुलगुरूंनी काटकसरीचे धोरण अवलंबले तरीही मानधनात सरळ १४० टक्के वाढ केली जात आहे. दरम्यान, नुकतीच विद्यापीठाने कंत्राटी पद्धतीने लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती केली असून, लिपिक १५,०००, तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना १०,००० मानधनावर सेवा द्यावी लागत आहे. अनेक पदवीधर, पदव्युत्तर शिक्षित तसेच काही अभियंतेही या अल्प मानधनावर कार्यरत आहेत. कमी मानधनावर तरुण तंत्रस्नेही कंत्राटी कर्मचारी मिळत असताना पेन्शनधारकांचे लाड मात्र पुरविले जात आहेत.
मानधनात ‘अशी’ होणार भरघोस वाढ नव्या प्रस्तावात मानधनाचे आकडे चक्रावून टाकणारे आहेत. यात नियमित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सध्या प्रतिमहिना मिळणारे १५,००० मानधन थेट २१,००० करण्याची शिफारस आहे. उपअभियंता, उद्यान अधीक्षक, आरेखक, मालमत्ता अधिकारी, कनिष्ठ अभियंता तसेच कुलगुरू व कुलसचिवांचे सहायक अशा पदांसाठी प्रतिमहिना तब्बल २६,००० ते २८,००० मानधन देण्याची शिफारस आहे. व्यवस्थापन परिषदेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विद्यापीठात एकूण ४७७ पदे मंजूर असून, हा आकडा गृहीत धरूनच पेन्शनधारकांना मानधनावर घेण्याचे प्रस्तावित आहे. व्यवस्थापन परिषदेत प्रारूप विनियम मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे.
अविनाश असनारे, कुलसचिव.








