अंजनगाव सुर्जी : मेळघाटातील सातपुड्याच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य खिरपाणी धबधबा पुन्हा एकदा एका निष्पाप जीवासाठी मृत्यूचा सापळा ठरला. अंजनगाव सुर्जी येथील आदित्य कमलेश ओळंबे (वय १६) या युवकाचा गुरुवारी दुपारनंतर धबधब्याच्या खोल डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेने अंजनगाव सुर्जीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, खिरपाणीच्या धोकादायक डोहाने पुन्हा एकदा एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याची वेदनादायी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य आपल्या काही मित्रांसह खिरपाणी धबधब्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेला होता. पावसाळ्यामुळे धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत होता आणि डोहातील पाण्याची खोली व प्रवाह दोन्ही अत्यंत धोकादायक झाले होते. अशा परिस्थितीतही आदित्यने पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. त्याच्या मित्रांनी वारंवार सावध राहण्याचा आणि डोहात उतरू नकोस, असा आग्रह धरला. मात्र काही क्षणांतच तो खोल पाण्यात ओढला गेला. मित्रांनी आरडाओरडा करत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु वेगवान प्रवाह आणि खोल पाण्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि वन विभागाची यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र संध्याकाळनंतर वाढलेला अंधार, मुसळधार पाऊस आणि डोहातील प्रचंड पाण्याचा वेग यामुळे बचाव व शोधकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्येक क्षणासोबत वाढणारी अनिश्चितता उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवत होती.
खिरपाणी धबधबा हा विदर्भातील अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक असला, तरी त्याच ठिकाणचा हा खोल डोह अनेक वर्षांपासून मृत्यूचा डोह म्हणून कुप्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे पर्यटकांच्या बुडून मृत्यूच्या घटना घडत असून, अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या परिसरात प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. धोक्याचे फलक, सूचना, जनजागृती आणि वारंवार दिले जाणारे इशारे असूनही अनेक पर्यटक नियमांकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालतात. सोशल मीडियासाठी फोटो, व्हिडिओ किंवा सेल्फी घेण्याच्या नादात अनेक जण स्वतःला संकटात ढकलत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खिरपाणीचा हा डोह अत्यंत खोल असून त्यामध्ये पाण्याखाली दगडी कपारी, भोवरे आणि वेगवान प्रवाह असल्याने एकदा व्यक्ती आत गेल्यानंतर त्याला सुरक्षित बाहेर काढणे अत्यंत कठीण ठरते. त्यामुळे या परिसरात केवळ सूचना फलक उभारून चालणार नाही, तर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, मजबूत सुरक्षा कुंपण, धोकादायक भागात प्रवेशबंदी, सीसीटीव्ही देखरेख, प्रशिक्षित बचाव पथकाची उपलब्धता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई यांसारख्या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
या दुर्दैवी घटनेने आदित्यच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अंजनगाव सुर्जी शहर शोकमग्न झाले आहे. निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना क्षणिक धाडस किंवा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याची ही घटना पुन्हा एकदा अस्वस्थ करणारी आठवण ठरली आहे. खिरपाणीच्या डोहात पुन्हा गेलेला हा तरुण जीव भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक कठोर आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची तीव्र गरज अधोरेखित करून गेला आहे.









