Edition

विनापरवाना साठवणूक; भेसळीच्या संशयावरून २,४२८ किलो गूळ जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : इतवारा बाजारातील विनापरवाना गूळ पूर्णा नगर येथील शीतगृहात साठवून ठेवल्याचे आढळून आले. अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी केलेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला. गुळाच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने तब्बल २ हजार ४२८ किलो गुळाचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गुळाची किंमत १ लाख ३६ हजार ४०० रुपये आहे.

 

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शनिवारी इतवारा बाजार येथील मे. गूळ शॉप या आस्थापनेची तपासणी केली. यावेळी ही आस्थापना विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आले. या आस्थापनेतील गूळ तक्ष कोल्ड स्टोरेज, पूर्णा नगर, अमरावती येथे साठवून ठेवण्यात आला होता. शीतगृहातील गुळाच्या साठ्याची तपासणी केली असता, गुळाच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाला. गुळामध्ये रंगाची भेसळ केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.

१ लाख ३६ हजारांचा गूळ ताब्यात

आस्थापना विनापरवाना असल्याने तसेच गुळामध्ये भेसळ केल्याचा संशय असल्याने शीतगृहातील सुमारे १ लाख ३६ हजार ४०० रुपये किमतीचा हा मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे व अनुराग चव्हाण यांनी केली.

अहवालानंतर पुढील कार्यवाही

गुळाच्या नमुन्याचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या दर्जाबाबत स्पष्टता होणार आहे. अहवालातील निष्कर्षानुसार संबंधित आस्थापनेविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांनी दिली. सोबतच, शहरातील अन्य आस्थापनादेखील अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें