पुण्यतिथी महोत्सवात मध्यरात्रीची घटना
तिवसा : राष्ट्रसंतांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवात गुरुकुंज मोझरी येथे सुरू असलेल्या यात्रा महोत्सवात सोमवारी मध्यरात्री वडा-पाव व फिंगर विक्रीसाठी करणाऱ्या एका मॉडिफाईड चारचाकी वाहनाला अचानक आग लागली. वाहनात घरगुती गॅस सिलिंडर असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. या आगीत वाहन जळून खाक झाले.
पोलिस सूत्रांनुसार, जिल्ह्यातील खरी धानोरा येथील वंदना सुधीर गवई यांच्या मालकीची ही व्हॅन (एमएच २९ एन ९२७८) पाळणे उभारलेल्या परिसरात उभी होती. सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास वाहनाला आग लागली. वाहनातील गॅस सिलिंडरमुळे आगीने काही वेळातच भीषण स्वरूप धारण केले. पाहता पाहता वाहन जळून खाक झाले. तिवसा पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे वैभव बोकडे, विजय यावले, अंकित माहोरे आणि राहुल आसोडे यांनी तातडीने आग आटोक्यात आणली.






