प्रशासनाचे डिजिटल पाऊल : नोंदणी पूर्ण; पोर्टल, मोबाइल अॅपद्वारे कामकाजाचे संनियंत्रण
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘डिस्ट्रिक कनेक्ट’ हे पोर्टल (मोबाइल अॅप) विकसित केले आहे. यामध्ये १३ शासकीय विभागांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. शिवाय १,३७८ अधिकारी-कर्मचारी जुळले आहेत. याद्वारे कामांची विभागणी करण्यात येत आहे व याच माध्यमातून दुष्काळ व पाणीटंचाईच्या कामांवर वॉच ठेवण्यात येणार आहे. कामे जलदगतीने होणार आहे.
जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व परिणामकारक होण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने ‘डिस्ट्रिक कनेक्ट’ हे पोर्टल व मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील कामकाजाचे ऑनलाइन संनियंत्रण करण्यात येत आहे.
सध्या महसूल विभाग, कृषी विभाग आणि आत्मा प्रकल्प या तीन विभागांमधील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोर्टलद्वारे विविध कामे सोपविण्यात येत आहेत. या प्रणालीमुळे क्षेत्रीय स्तरावरील कामकाजावर नियमित देखरेख ठेवणे, प्रलंबित कामांचा त्वरित पाठपुरावा करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे तसेच प्रशासकीय निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान करणे शक्य होणार आहे. विविध शासकीय विभागांमधील कामकाजाचा समन्वय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणे, ही या पोर्टलची उपलब्धी ठरली आहे. या प्रणालीमुळे क्षेत्रीय स्तरावरील कामकाजावर नियमित देखरेख ठेवणे, प्रलंबित कामांचा पाठपुरावा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे तसेच प्रशासकीय निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान करणे शक्य होणार आहे.
कामांचे ऑनलाइन वाटप, कार्यवाहीचा अहवाल
जिल्हा व तालुकास्तर
अधिकाऱ्यांना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामे ऑनलाइन सोपविण्याची सुविधा होईल. अधिकारी व कर्मचारी मोबाइल अॅपच्या माध्यमातून त्यांना सोपविण्यात आलेल्या कामांची दखल घेऊन, कार्यवाहीचा अहवाल, शेरा, छायाचित्रे, व्हिडिओ व आवश्यक कागदपत्रे थेट अपलोड करून काम पूर्ण झाल्याची माहिती सादर करू शकतात. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावरूनच कामकाजाचा अहवाल सादर करणे शक्य होते.
ही आहे पोर्टलची उपलब्धी
क्षेत्रीय भेटी, पाहणी व प्रत्यक्ष कार्यवाहीचे फोटो, व्हिडिओ आणि जिओ टॅग माहिती अपलोड करण्याची सुविधा यामध्ये आहे. सोपविलेल्या कामांची सद्यस्थिती, पूर्ण झालेली व प्रलंबित कामे यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. कामाची दखल, शेरा व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करण्याची सुविधा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी दिली.
‘डिस्ट्रीक्ट कनेक्ट’ हा उपक्रम जिल्ह्यात डिजिटल गव्हर्नन्सला चालना देणारा आणि प्रशासन व क्षेत्रीय यंत्रणा यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.
आशिष येरेकर, जिल्हाधिकारी






