Edition

पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डिझेलटंचाईचा फटका; काळाबाजाराच्या आरोपांनी संताप वाढला

परभणी : भीषण उकाड्यात शेतीच्या कामांचा अंतिम टप्पा सुरू असताना चारठाणा येथील पेट्रोल पंपावर डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. डिझेल भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागत असून अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून ओळखीने आणि जादा पैसे घेऊन डिझेल दिले जात असल्याचे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत. त्यामुळे परिसरात कृत्रिम डिझेलटंचाई निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.

ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रांना डिझेल मिळत नसल्याने शेतकरी मोटारसायकलवर कॅन आणि ड्रम घेऊन पेट्रोल पंपांचे फेरे मारताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अधिक पैसे देणाऱ्या दलालांना २००-२०० लिटर डिझेल दिले जात असून तेच डिझेल गावात १५० ते २०० रुपये प्रति लिटर दराने काळ्या बाजारात विकले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

खरीप हंगाम धोक्यात; आर्थिक फटका बसण्याची भीती स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वी शेतीची तयारी वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. मात्र वेळेवर डिझेल न मिळाल्यास खरीप हंगामातील मशागतीची कामे खोळंबतील आणि मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी : या गंभीर परिस्थितीची दखल घेत संबंधित तेल कंपन्यांनी चारठाणा परिसरातील डिझेलपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. तसेच परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून काळाबाजार रोखावा आणि शेतकऱ्यांना तातडीने डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मानवतमध्ये डिझेलवरून हाणामारी परभणी जिल्ह्यातील मानवत येथे एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मानवत तालुक्यातील रूढी पाटी परिसरातील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी मोठी रांग लागली होती. याच वेळी दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. दोन्ही बाजूंनी डिझेलसाठी आणलेल्या डब्यांनी आणि कंटेनरने एकमेकांवर हल्ला केल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे इंधन वितरणही काही काळ विस्कळीत झाले.

रोहित पवारांचाही सरकारवर निशाणा दरम्यान, रोहित पवार यांनीही सरकारवर टीका करत इंधनटंचाई, महागाई आणि इतर प्रश्नांवर सरकार संवेदनाहीन असल्याचा आरोप केला. रोम जळत असताना नीरो बासरी वाजवत होता, असे उदाहरण देत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. सध्या या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे.

उन्हातान्हात लोक तासन्तास रांगेत विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “मानवत येथे डिझेलसाठी लोकांमध्ये मारामारी होणे हेच का भाजपचे ‘अच्छे दिन’ आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सामान्य नागरिक उन्हात तासन्तास रांगेत उभे राहत असताना सरकार केवळ जाहिरातबाजी आणि इव्हेंटबाजीत व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात इंधनटंचाई नसल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. अनेक जिल्ह्यांत शेतकरी डिझेलसाठी रांगेत उभे असून त्यामुळे शेतीची कामे प्रभावित होत असल्याचा दावा त्यांनी केला.

 

Z 24 News
Author: Z 24 News

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें