30 वर्षीय विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली होती. आरोपींना अटक करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली.
पुणे : पुण्यातील मुकुंदनगर परिसरात 30 वर्षीय विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली होती. पायल अक्षय झांबरे असे मृत महिलेचे नाव असून, सासरच्या मंडळींकडून हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप पायलच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच या प्रकरणात पती अक्षय झांबरे याला अटक करण्यात आली. बाकीचे आरोपी हे फरार असून, बुधवारी सकाळपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही तर नॅशनल हायवे रोखू, असा इशारा पायलच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी – पायल झांबरे प्रकरणात स्वारगेट पोलीस स्टेशन येथे पती अक्षय झांबरे, सासू, सासरे, नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अक्षय झांबरे याला अटक करण्यात आली असून, त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने झांबरे याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पायलचे नातेवाईक आक्रमक – पायल झांबरे यांचे कुटुंबीय तसेच नातेवाईक यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलिसांची भेट घेतली. पायलचे सासरे, सासू, नणंद हे फरार असून, त्यांना अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाही. “बुधवारी सकाळपर्यंत त्यांना अटक नाही झाली तर आम्ही सर्व गावकरी नॅशनल हायवे रोखू तसेच या घटनेला 45 तास उलटत असून अजूनही आरोपी सापडले नाहीत. सासरे पोलीस स्टेशन येथे आले असताना त्यांना एका पोलिसाने बाहेर नेले तसेच ज्या सोसायटीत घटना घडली आहे तिथले सीसीटीव्ही कॅमेरे देखील जप्त केलेले नाहीत,” असा आरोप पायलच्या नातेवाईकांनी केला आहे.
पोलिसांनी दिली प्रतिक्रिया – यावेळी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते म्हणाले, “पायलच्या नातेवाईकांनी भेट घेतली. त्यांनी आमच्याशी चर्चा केली आहे. त्यांची भावना या संतप्त असून, त्यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रकरणात पती अक्षय झांबरे याला अटक करण्यात आली असून, त्याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच सासऱयांना त्रास होत असल्याने त्यांना ऍडमिट करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत ठीक झाल्यावर त्यांना अटक करण्यात येणार आहे. पायलने आत्महत्या करण्याआधी व्हॉट्सॲपवर जे लिहिलं आहे त्यात तिने सासरचे लोक जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. याचा देखील आम्ही तपास करत आहोत.”







