परतवाडा : येत्या आठ ते दहा दिवसांवर धुलिवंदन सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात विविध रंग विक्रीस आल्याने प्रमुख बाजारपेठेतील रस्ते हे रंगीबेरंगी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मेळघाटच्या आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी आहे. ते पाच दिवस हा सण साजरा करतात. यात ढोल-बासरीच्या तालावर ठेका धरत फगवा मागितला जातो. जिल्ह्यातील शहरांसह गावात रंग विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. विशेष म्हणजे, किराणा दुकानदार, जनरल स्टोअर्स चालकांनीही रंग आणि पिचकाऱ्या विक्रीस ठेवल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र वेगवेगळ्या रंगाची दुकाने आणि त्यातून रंगलेला बाजार पाहायला मिळत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दहा ते वीस टक्क्यांनी किंमत वाढली असून, ग्राहक देशी आणि इको फ्रेंडली रंगांना पसंती देत आहेत. चमकी अथवा त्वचेवर चिकटणारे रंग तरुण अधिक घेताना दिसत आहेत.
रंगांचा बाजार काय सांगतोय?
ब्रेडेड रंगांची मागणी : दिसायला सुंदर, आकर्षक रंगांची मागणी वाढली आहे. त्यात वेगवेगळ्या बँडची ग्राहक मागणी करत आहेत.
दहा टक्के वाढ झाली : गतवर्षीच्या तुलनेत यंदा रंगासह पिचकारी, साहित्याच्या किमती दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या आहेत.
स्वस्त/देशी रंगांची मागणी :
शरीरावरून सहज निघणारे आणि देशी पद्धतीने केलेल्या रंगांची मागणी अधिक आहे. अनेकजण गुलाल, उधळून रंगपंचमी साजरी करतात.
चेहऱ्याची त्वचा असते नाजूक गाल आणि चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. त्यामुळे रंग खेळत असताना बॉडी लोशन, खोबरेल तेल चेहऱ्यावर लावावे. त्वचा घासून धुवू नये, असे त्वचारोगतज्ज्ञ सांगतात.
त्वचेची काळजी कशी घ्याल?बाजारात येणाऱ्या रंगांमध्ये रासायनिक रंग अधिक आहेत. त्यात केमिकलचा वापर केला जातो. त्यापासून बचाव करण्यासाठी त्वचेवर खोबरेल तेल अथवा स्कीन लोशन लावावे, त्यानंतर रंग खेळावा.
ग्राहकांमध्ये जागरूकता झाली आहे. त्यामुळे इको फ्रेंडली रंगांची मागणी वाढली. त्यांच्या किमती अधिक असूनही ग्राहक ते खरेदी करत आहेत.
कमल गुप्ता, व्यापारी
रासायनिक रंगांपासून दूरच राहिलेले बरे…
रासायनिक रंगाचा वापर केल्याने त्वचेवर खाज सुटणे, फोड येणे असे प्रकार घडतात. त्यामुळे रासायनिक रंगापासून दूरच राहिलेले बरे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com