तपासणीत २२ हजार लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र !
अमरावती : विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी म्हणून पात्र ठरविण्यात आलेल्या लाडक्या बहिणींच्या प्रस्तावांची फेरतपासणी पूर्ण झालेली आहे. या तपासणीत जिल्ह्यातील २२ हजार ६७ लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या कारणांमुळे सदर लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांच्याकडून यापूर्वी दिलेली अनुदानाची रक्कम मात्र परत घेतली जाणार नाही. परंतु आता फेब्रुवारी २०२५ पासून त्यांचे अनुदान मात्र थांबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ७ लाख २० हजार ६०३ महिलांनी या योजनेकरिता नोंदणी केली होती. यापैकी ६ लाख ९८ हजार ५३६ महिला योजनेसाठी पात्र ठरल्या. निवडणुका दरम्यान आटोपून नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व प्रस्तावांची फेरतपासणी सुरू करण्यात आली असून निकषात न बसणाऱ्या ऑनलाइन अर्ज दाखल करणाऱ्या महिलांचे तेव्हा पात्र ठरविण्यात आलेले अर्ज आता रद्द केले जात आहेत. आतापर्यंत २२ हजार ६७ महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले आहे, अशी माहिती यंत्रणेने दिली आहे.
२१०० चा लाभकेव्हा मिळणार?
लाडकी बहिणी योजनेत प्रारंभी दिला जात असलेला दीड हजार रुपये अनुदानाचा लाभ निवडणुकीदरम्यान २१०० रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. त्यानुसार आता दरमहा २१०० रुपयांचा लाभ केव्हा मिळणार, हा प्रश्न सतावतो आहे. त्यामुळे तो निवडणुकी पुरता तर फंडा नव्हता ना अशी शंकाही व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे अनेक महिलांना आपले नाव योजनेतून रद्द करण्यात आले आहे, असे मेसेज येऊ लागल्याने महिलावर्गात कमालिची नाराजी गावोगावी व शहरोशहरी व्यक्त होऊ लागली आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com