आदिवासींचे वेतन होळीपूर्वी, खासदारांचे रोहयो सचिवांना निवेदन
चिखलदरा : मेळघाट विधानसभा क्षेत्र हा आदिवासीबहुल भाग असून, चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजूर वर्ग महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून कामे करीत आहे. परंतु, त्यांना मजुरी ही मागील चार ते पाच महिन्यांपासून ते अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे उदरनिर्वाह कठीण होऊन बसला आहे. त्यामुळे मेळघाटमधील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यांना तत्काळ मजुरी देण्याची मागणी विधानसभेत गुरुवारी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर होळीपूर्वी निधी दिला जाणार असल्याचे आश्वासन मिळाले.
शासन निर्णयाप्रमाणे मजुरांना १५ दिवसांपर्यंत मजुरी मिळणे अपेक्षित असताना व आदिवासी बांधवांचा मुख्य सण होळी जवळ आलेला असताना मजुरी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. १३ मार्चलाला होणाऱ्या होळी सणापूर्वी रोहयोमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे पगार देण्यात यावे, असा ऑनलाइन तारांकित प्रश्न मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी उपस्थित केला.
खासदारांनी घेतली प्रधान सचिवांची भेट
मेळघाटातील धारणी तसेच चिखलदरा तालुक्यातील हजारो आदिवासी मजुरांचे रोहयोमधील अकुशल कामाचे देय ६५ कोटी रुपये प्राप्त नसल्याने मजुरांना मजुरीची रक्कम मिळालेली नाही. मेळघाटातील आदिवासी मजुरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा सण म्हणजे होळी काही दिवसांवर असून मजुरीची रक्कम तातडीने मिळण्याबाबत खा. बळवंत वानखडे यांच्याकडे मागणी होती. त्यांनी रोहयोचे प्रधान सचिव गणेश पाटील यांच्याकडे मंत्रालयात भेटून तातडीने निधी वितरित करण्याची मागणी केली.
दरवर्षी तोच खेळ….
दरवर्षी दिवाळी दरम्यान हजारो मजुरांचे कोट्यावधी रुपयांची मजुरी थकीत असते. पंधरा वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. घाम गाळूनही गोरगरीब मजुरांना आंदोलन करावे लागत असल्याची शोकांतिका ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रकाशित केली होती, हे विशेष

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com