
अमरावती : तुरीच्या खरेदीसाठी २१केंद्रांवर ५३५७ शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत ऑनलाइन नोंदणी केलेली असताना फक्त पाच केंद्रांवर खरेदी होत आहे. आता हरभऱ्याचा हंगाम सुरू झालेला असताना शासनाद्वारे नोंदणीचे आदेश नाहीत. त्यामुळे खरेदी केव्हा करणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
तुरीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्याने २३ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २१ केंद्रांवर नोंदणी सुरू झालेली आहे. यामध्ये व्हीसीएमएफचे धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, अमरावती,चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, येवदा, कापूसतळणी, भातकुली, गणेशपूर, शिंगणापूर व बाभळी केंद्रे आहेत. या केंद्रांवर ३१४६ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.
याशिवाय डीएमओ यांच्या अचलपूर जयसिंग, अचलपूर, चांदूररेल्वे, दर्यापूर, धारणी, खल्लार, नेरपिंगळाई, नांदगाव खंडेश्वर व तिवसा या केंद्रांवर २२११ शेतकऱ्यांनी तुरीच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. खरेदीसाठी क्षेत्र निश्चिती झालेली असताना केंद्र सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
शेतकऱ्यांचा तूर विक्रीला प्रतिसाद नाही केंद्र शासनाने यावर्षी तुरीला ७५५० रुपये हमीभाव दिलेला आहे. चार महिन्यांपूर्वी तुरीचे दर १२ हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर सातत्याने घसरण झालेली असली तरी हमीभाव एवढा दर स्थानिक बाजार समितीमध्ये मिळत आहे. शिवाय पेमेंट देखील नगदी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीसाठी नाफेडकडे प्रतिसाद नाही.
हरभऱ्याला हमीभावाचे संरक्षण कुठे ?यावर्षी हरभऱ्याला ५६५० रुपये क्विंटल हमीभाव देण्यात आलेला आहे व बाजार समित्यांमध्ये त्यापेक्षा कमी किमतीत हरभरा विकला जात आहे. त्यामुळे शेतमालास हमीभावाचे संरक्षण देण्यासाठी शासनाने नाफेडची नोंदणी सुरू करावयास पाहिजे. प्रत्यक्षात हरभऱ्याचा हंगाम सुरू झालेला असताना नोंदणीचे शासन आदेश नाहीत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





