दोन सराईत गुन्हेगारांना अटक : क्राईमची कारवाई
अमरावतीः शहर गुन्हे शाखेने सोमवारी मोठी कारवाई करत येथील ट्रान्सपोर्ट नगर येथून १६ गॅस सिलिंडर चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेमुळे सिलिंडर चोरीसह जनावरे चोरीचे अन्य तीन गुन्हे असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ट्रान्सपोर्ट नगर येथून फिर्यादी मोहम्मद साजीद मोहम्मद नासीर यांचे १६ गॅस सिलिंडर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते. तपासादरम्यान चोरी केलेले सिलिंडर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून विक्रीसाठी नेले जात असल्याची माहिती टिम क्राईमला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चपराशीपुरा भागातील हॅलो कॉर्नर हॉटेलसमोर सापळा रचला. संशयास्पद कारची झडती घेतली असता, त्यात चोरीला गेलेले १६ सिलिंडर मिळून आले. पोलिसांनी तातडीने कारमधील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारवाईत ५ लाख ३१ हजार रुपये किमतीचे १६ गॅस सिलिंडर आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी
शेख अतीक शेख रऊफ (वय ३१, रा. बिस्मिल्ला नगर, अमरावती) व मोहम्मद कासीफ मोहम्मद अकबर (वय २३, रा. अकोला, सध्या मुक्काम कारंजा लाड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी सिलिंडर चोरीची कबुली दिली. इतकेच नव्हे तर, त्यांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रात विविध ठिकाणी जनावरे चोरी केल्याचेही मान्य केले. यामध्ये गाडगेनगर, बडनेरा आणि भातकुली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





