३१ रुग्णवाहिका रडारवर; १० एप्रिलच्या अहवालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
अमरावती : राज्यातील रुग्णवाहिका सेवेतील कथित सावळागोंधळ आणि बीव्हीजी कंपनीच्या अवाढव्य बिलांवरून आरोग्य विभाग आता आक्रमक झाला आहे. पुणे आरोग्य सेवेचे उपसंचालक जयंत मुळे यांनी दिलेल्या आदेशानुसार, अमरावती जिल्ह्यातील सर्व १०८ रुग्णवाहिकांची ‘चेक लिस्ट’द्वारे कसून तपासणी करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात सुमारे ४,१३,८८३ आणीबाणीच्या प्रसंगी सेवा दिलेल्या रुग्णवाहिकांच्या ताफ्याची आता प्रत्यक्ष ‘पोलखोल’ होणार आहे.
अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत १०८ कार्यरत असलेल्या सर्व रुग्णवाहिका या तपासणीच्या कक्षेत येणार आहेत. आरोग्य विभागाच्या ताफ्यात अमरावतीत ३१ तर राज्यातील एकूण १,७५६ रुग्णवाहिकांचा समावेश असून, जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णवाहिकेमध्ये दोन डॉक्टर, आवश्यक औषधी साठा आणि जीवनरक्षक यंत्रणा सुस्थितीत आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे.
१० एप्रिलचा ‘डेडलाइन’ आणि फॉलो-अप उपसंचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना १० एप्रिल २०२६ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालात रुग्णवाहिकेतील साहित्याची कमतरता किंवा डॉक्टरांची अनुपस्थिती आढळल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. या अहवालानंतर जिल्ह्यातील आरोग्यसेवेचे नेमके चित्र स्पष्ट होईल.
अमरावती जिल्ह्यात बीव्हीजीच्या ३१ रुग्णवाहिका असून यात ६ व्हेटिलेटरची सुविधा आहे. त्या सुस्थितीत सुरू असल्यामुळे रुग्णसेवेत कार्यरत आहेत. तपासणीचे पत्र प्राप्त झाले.
सुशील वाकचौरे, उपसंचालक आरोग्य विभाग अकोला
बीव्हीजी कंपनीची बाजू काय ?
बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीने यापूर्वी प्रगत तंत्रज्ञान आणि रिअल-टाइम ट्रॅकिंगद्वारे पारदर्शक सेवा देत असल्याचा दावा केला आहे. नवीन कंत्राटानुसार, सुमीत फॅसिलिटीज आणि बीव्हीजी यांच्या सहकार्याने पुढील १० वर्षासाठी १६०० कोटींची गुंतवणूक करून ही सेवा अधिक सक्षम केली जाणार आहे.
तपासणीतील प्रमुख ‘चेक पॉइंट्स’
कर्मचारी उपस्थिती : रुग्णवाहिकेत प्रशिक्षित ड्रायव्हर आणि ईएमएसओची उपस्थिती.
वैद्यकीय उपकरणे : डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, सक्शन पंप आणि ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता.
स्वच्छता व देखभाल : रुग्णवाहिकेची आतील व बाहेरील स्वच्छता
वैद्यकीय पथकः रुग्णवाहिकेत दोन डॉक्टर उपस्थित आहेत का? साहित्यः आपत्कालीन औषधे, ऑक्सिजन आणि इतर उपकरणे सुस्थितीत आहेत का? संचलनः जीपीएस रिडींग, प्रत्यक्ष कि.मी.मध्ये तफावत आहे का? इंधनः शासकीय रुग्णवाहिकांच्या तुलनेत खासगी कंपनीच्या इंधन खर्चाचे ऑडिट.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com




