खाकी’चे राहणार लक्ष:डीसीपींनी काढली अधिसूचना
अमरावती : धूलिवंदनाच्या दिवशी अर्थात १४ मार्च रोजी खबरदारीची उपाययोजना म्हणून सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपावेतो शहरातील तीनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहतील. गाडगेनगर समाधी मंदिरापासून ते जिल्हा स्टेडियम, इर्विन चौक ते राजापेठ पोलिस ठाणे व कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीचा आदेश काढण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर
यांनी त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे.यंदा १४ मार्च रोजी धुळवड होऊ घातली आहे. होळी, धूलिवंदन सण नागरिक हर्षोल्हासात साजरा करतात. या सण उत्सवादरम्यान काही नागरिक बियर बार, धाबे, हॉटेल्स आदी ठिकाणी मद्यप्राशन करून रस्त्यावरून मोटारसायकलवर दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती बसून भरधाव वेगाने वाहन चालवितात. अशा परिस्थितीत वाहन चालविताना वाहनचालकांचे संतुलन राहत नाही. त्यामुळे बरेचदा अपघातासारखा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने शहरात अपघातासारखा कोणताही अनुचित प्रकार व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊ नये, याकरिता जनसामान्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते आदेश काढण्यात आले आहेत.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com