रोहित शर्मानं शुबमन गिलसोबत रचलेला भक्कम पाया, मध्यफळीत श्रेयस अय्यरससह अक्षर पटेलनं केलेली उपयुक्त खेळी आणि लोकेश राहुलसह हार्दिक पांड्याचा तोरा याच्या जोरावर भारतीय संघानं फायनल बाजी मारलीये. दुबईच्या मैदानात रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनल लढतीत किवींनी कडवी टक्कर दिली. पण मजबूत इराद्यासह मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं २५ वर्षांचा हिशोब चुकता करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. भारतीय संघानं विक्रमी तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकलीये. १२ वर्षानंतर भारतीय संघानं वनडे आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
याआधी भारतीय संघानं चार वेळा फायनल खेळली. २००० च्या हंगामात न्यूझीलंडनं भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यानंतर २००२ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध या स्पर्धेचे संयुक्त जेतेपद पटकावल्याचे पाहायला मिळाले. २०१३ मध्ये भारतीय संघानं ही ट्रॉफी जिंकली होती. २०१७ च्या गत हंगामातही टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल गाठली. पण पाकिस्तानच्या संघासमोर टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पाचव्यांदा फायनलमध्ये पोहल्यावर टीम इंडियाने विक्रमी तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले आहे. सर्वाधिक वेळा ही ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आता टीम इंडियाच्या नावे झाला आहे. सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या यादीत ऑस्ट्रेलियनं संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी २००६ आणि २००९ च्या हंगामात ही स्पर्धा जिंकली होती.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com