अमरावती : दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरोने व्याघ्र तस्करीबाबत देशभरात दिलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेत पोलिस व वनअधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी मंगळवारी ग्रामीण भागात ठाणेस्तरावर संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत राखीव जंगलालगत झोपड्या, मुशाफिरांची कसून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत..
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरोचे सहसंचालक डॉ. मनोज कुमार यांनी ‘रेड अलर्ट’ जारी केला. यानंतर पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार मेळघाटातील ठाणेनिहाय मंगळवारी ठाणेदार, वनअधिकारी, पोलिस पाटील यांची संयुक्त बैठक पार पडली. वनसीमेवरील गाव, खेड्यात अनोळखी व्यक्ती आल्यास पोलिस पाटील यांना ठाणेदारांना माहिती द्यावी लागेल, असे ठरविण्यात आले. मेळघाटसह चांदूर रेल्वे, कुन्हा, तिवसा, मोर्शी, वरूड या ठाण्यांमध्ये ही बैठक घेतली जाणार आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, राखीव वन भागातील ठाणेनिहाय वनअधिकारी, ठाणेदार, पोलिस पाटील यांची संयुक्त बैठक मंगळवारी झाली. यात लगतच्या गावांमध्ये झोपड्या, मुशाफिरांची कसून तपासणी होणार आहे. अशा गावात ये-जा करणाऱ्यांची नोंद पोलिस पाटलांना ठेवावी लागणार आहे.
विशाल आनंद, जिल्हा पोलिस अधीक्षक, अमरावती.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com