पथ्रोट, (वा.). पशु दवाखान्याच्या बांधकामासाठी 80 लाखांचा निधी मंजूर झाल्यावर सदर दवाखान्याच्या बांधकामाचा मुहूर्त लागला खरा. मात्र, सदरच्या बांधकामावर पाण्याचा किरकोळ थातूरमातूर वापर होत असून, पशुंच्या ये-जा करण्याच्या मार्गात उंच चौकट तयार केल्याने त्यांच्या प्रवेशाबाबत अडथळा निर्माण झाला (दि.16) आहे. याबाबत बांधकाम विभागाचे पूर्णतः झालेले दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. मागील 6 महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या सदर दवाखान्याबाबत वृत्त प्रकाशित करून वाचा फोडलेली होती. त्यानंतर दवाखान्याचे 24 जानेवारी 2025 ला डिसमेंटल करून बांधकामाचा मुहूर्त लावण्यात आला होता. 1966/67 च्या दरम्यान या ठिकाणी काणी बस स्टँडच्या मुख्य चौकाला लागून स्थापन असलेल्या कृत्रिम रेतन उपकेंद्राच्या इमारतीतून पशु वैद्यकीय सेवेचे नियमित कामकाज सुरू होते. सदर इमारतीला 58 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. यादरम्यान ती इमारत अनेक ठिकाणी क्षतीग्रस्त झालेली होती. एवढेच नव्हे, तर या इमारतीच्या बाजूला पाण्याच्या टाकीचा परिसर व आठवडी बाजारातील मटन शॉपचा परिसर लागून आहे. या दोन्ही ठिकाणी अत्यंत घाण साचलेली आहे.
मागील अनेक वर्षांपासून त्या ठिकाणची घाण स्वच्छ करण्याचे कधीच प्रयत्न न केल्यामुळे त्याला शौचालयाचे स्वरूप आले होते. अशावेळी परिसरातील नागरिक दिवसभर या पशु वैद्यकीय इमारतीच्या आवारातूनच येणे जाणे करीत होते. हा सर्व प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू होता. त्यामुळे दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी व उपचाराकरिता पशु घेऊन येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.
गुणवत्तेबाबत निर्माण होताहे प्रश्नचिन्ह 80 लाख रुपयांच्या निधीतून सदरचे बांधकाम होत आहे. मात्र, जुनी इमारत स्थापन होती. त्यावेळी तिला 2 ठिकाणावरून प्रवेशाचे मार्ग होते. अशावेळी गावातून येणाऱ्या पशुमालकांना एक तर महामार्गावरील परिसरातील पशुमालकाला येण्यासाठी दुसरा असे वेगवेगळे 2 प्रवेशद्वार या इमारतीला होते. तेव्हा नव्याने बांधकाम करताना गावातून येणाऱ्या प्रवेशद्वाराला बंद करण्याचा घाट कंत्राटदाराकडून रचण्यात आला होता. याबाबत त्यांना अवगत केल्यानंतर त्यांनी जुन्या ठिकाणी प्रवेशद्वार घेण्याचे निश्चित केले. असे करताना त्या ठिकाणचे बांधकाम मात्र उंचावर केल्याने पशुना तर सोडा नागरिकांनाही येणे कठीण होऊन बसले आहे. अशावेळी 2 ठिकाणाचे प्रवेशद्वार एका ठिकाणावर आणून त्यांनी आपले काय हित साधले यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शिवाय इमारतीच्या बांधकामावर थातूरमातूर पाणी मारून गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 58 वर्षानंतर पुन्हा एकदा बांधकाम होत असलेल्या या इमारतीचे गुणवत्तापूर्वक बांधकाम न झाल्यास शासनाच्या मोठ्या निधीचा दुरूपयोग होईल.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com