-सचिन इंगळे (प्रतिनिधी)अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी नगर परिषदेतील उपनगराध्यक्ष पद सध्या रिक्त असल्याने शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना जोर चढला आहे. बदलते पक्षीय संख्याबळ, आघाडी-प्रत्याघाडीची गणिते आणि सत्तेतील नाजूक समतोल यामुळे हे महत्त्वाचे पद नेमके कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत अद्याप ठोस चित्र स्पष्ट झालेले नाही. परिणामी, राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अलीकडे पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत संमिश्र निकाल समोर आला. काँग्रेसचे ९, भाजपचे ६, शिवसेना शिंदे गटाचे ३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ७, समाजवादी पक्षाचे २ तर १ अपक्ष नगरसेवक विजयी झाले आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने प्रत्येक निर्णयासाठी राजकीय जुळवाजुळवी करणे अपरिहार्य ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षपदाची निवड अधिकच महत्त्वाची बनली आहे.
दरम्यान, १ जानेवारी २०२६ रोजी भाजपचे अविनाश गायगोले यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नगर परिषदेच्या कारभाराला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र उपनगराध्यक्ष पद रिक्त असल्याने सत्तेचा समतोल कसा राखला जाणार, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत कारभार सांभाळणे, प्रशासनाशी समन्वय साधणे आणि विकासकामांवर देखरेख ठेवणे या दृष्टीने उपनगराध्यक्षपदाला विशेष महत्त्व आहे.
विविध पक्षांकडून उपनगराध्यक्षपदासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत. आपापल्या संख्याबळाच्या जोरावर आघाड्या बांधण्याचे प्रयत्न सुरू असून, बंद दाराआड चर्चा, वरिष्ठ नेत्यांशी संपर्क आणि नगरसेवकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. कोणता गट निर्णायक ठरणार, कोणाला पाठिंबा मिळणार, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या घडामोडींचे पडसाद शहरात सर्वत्र उमटताना दिसत आहेत. चौकाचौकांत, बाजारपेठेत आणि चहाच्या टपऱ्यांवर उपनगराध्यक्षपदाचीच चर्चा रंगत असून, शहराच्या विकासाला चालना देणारे, सर्वांना सोबत घेणारे सक्षम नेतृत्व मिळावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
आता नगर परिषदेच्या आगामी बैठकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या बैठकीत उपनगराध्यक्षपदाबाबत निर्णय होणार की नाही, यावर अंजनगाव सुर्जीच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. तोपर्यंत मात्र चर्चांचा आणि अंदाजांचा जोर कायम राहणार, हे निश्चित आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com









