मंगळवेढा (सोलापूर): एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ला ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानले जाते, मात्र याच लालपरीच्या एका वाहका (कंडक्टर) कडून माणुसकीला काळिमा फासणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे घडली आहे. अवघ्या पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याकडे एसटीचा पास नव्हता आणि तिकिटासाठी पैसेही नव्हते, या क्षुल्लक कारणावरून वाहकाने त्याला भर महामार्गावर निर्दयीपणे खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकी घटना काय? मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे राहणारा प्रथमेश राहुल पाटील हा विद्यार्थी मंगळवेढ्यातील एका शाळेत पाचवीच्या वर्गात शिकतो. शनिवारी शाळा सुटल्यानंतर तो नेहमीप्रमाणे आपल्या गावी जाण्यासाठी मंगळवेढा बस स्थानकावरून सोलापूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये (एमएच १३/सीयू ९४०५) बसला.
बस मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील दामाजी कारखान्याजवळ आली असता, वाहकाने तिकीट तपासणी सुरू केली. यावेळी प्रथमेशने आपल्या दप्तरात पास शोधला, मात्र घाईगडबडीत त्याचा पास घरीच विसरल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने वाहकाला आपली अडचण सांगितली आणि “माझ्या वडिलांना फोन करा, ते तुम्हाला पैसे पाठवतील,” अशी विनवणीही केली. मात्र, निष्ठुर झालेल्या वाहकाने त्याचे काहीही न ऐकता, भररस्त्यात बस थांबवून त्याला खाली उतरवले.
पालकांचा आणि नागरिकांचा संताप रस्त्यावर एकटे सोडल्यामुळे घाबरलेला प्रथमेश रडत होता. ही बाब समजताच त्याच्या पालकांनी आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. पास विसरल्यासारख्या छोट्या कारणावरून लहान मुलांना अशा प्रकारे महामार्गावर वाऱ्यावर सोडणे किती योग्य आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कारवाईची मागणी या गंभीर प्रकारानंतर प्रथमेशच्या पालकांनी संबंधित वाहकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मंगळवेढा आगार व्यवस्थापक संजय भोसले यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशी करून संबंधित वाहकावर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com









