प्रेयसीच्या घरच्यांचा विश्वास जिंकण्यासाठी तरुणाचा ‘फिल्मी’ स्टंट; स्वतःच घडवला अपघात आणि बनला ‘हिरो’, पण…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

पठाणमथिट्टा (केरळ): प्रेमात आणि युद्धाच सगळं काही माफ असतं, असे म्हणतात. मात्र, केरळमधील एका तरुणाने आपल्या प्रेयसीला मिळवण्यासाठी आणि तिच्या घरच्यांचा विश्वास जिंकण्यासाठी जो प्रकार केला, तो वाचून तुम्हीही थक्क व्हाल. ‘दृश्यम’ स्टाईलने बनाव रचून स्वतःच्याच प्रेयसीचा अपघात घडवून आणणाऱ्या प्रियकराला आणि त्याच्या मित्राला केरळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय? ही घटना केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यात घडली. रंजित राजन (वय २४, रा. कोन्नी) असे या ‘फिल्मी’ प्रियकराचे नाव आहे. रंजितचे एका तरुणीवर प्रेम होते, मात्र त्यांच्या लग्नासाठी मुलीच्या घरच्यांची मर्जी संपादन करणे त्याला कठीण जात होते. स्वतःला मुलीच्या आणि तिच्या घरच्यांच्या नजरेत ‘हिरो’ बनवण्यासाठी त्याने एक भयानक कट रचला.

अपघाताचा बनाव: रंजितने आपला मित्र अजेश (वय १९) याच्या मदतीने २३ डिसेंबर रोजी हा प्लॅन अमलात आणला. ठरल्याप्रमाणे, तरुणी आपल्या स्कूटरवरून कोचिंग क्लासवरून घरी परतत असताना, अजेशने एका कारने तिच्या स्कूटरला धडक दिली आणि तो पळून गेला. या अपघातात तरुणी खाली पडली आणि तिच्या हाताला दुखापत झाली.

नेमके त्याच वेळी रंजित दुसऱ्या कारमधून तिथे ‘देवदूतासारखा’ हजर झाला. त्याने तत्परता दाखवत जखमी तरुणीला उचलले आणि स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेले. आपणच तिचे प्राण वाचवले आहेत, असे भासवून त्याने मुलीच्या घरच्यांचा आणि स्थानिक लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला सर्व काही त्याच्या योजनेनुसार झाले आणि मुलीच्या पालकांनी त्याचे आभारही मानले.

बिंग कसे फुटले? स्थानिक पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना काही गोष्टी खटकल्या. ज्या वेळेस अपघात झाला, त्याच वेळी रंजित तिथे इतक्या लवकर कसा पोहोचला, यावरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, अपघाताचा हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे दिसून आले. धडक देणारी कार आणि रंजितची कार यांच्या हालचालींवरून पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी धडक देणाऱ्या कारचा शोध घेऊन अजेशला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितले की, हा सर्व बनाव रंजितच्या सांगण्यावरून रचण्यात आला होता.

कारवाई: या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार रंजित राजन आणि त्याचा मित्र अजेश या दोघांना अटक केली आहे. प्रेयसीचा विश्वास जिंकण्यासाठी केलेला हा जीवघेणा स्टंट आता त्यांच्या अंगलट आला असून, पोलिसांनी दोघांवरही हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रेमासाठी वाटेल ते करण्याच्या नादात या तरुणाने थेट तुरुंगाची हवा खाल्ली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

011973
error: Content is protected !!