संस्कारांची शिदोरी आणि सूरांची उंची : अंजनगाव सुर्जीत सावित्री-जिजाऊ जयंती सोहळा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी येथे सावित्री-जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत ओंकार स्वरूपा सांस्कृतिक कला अकादमीच्या वतीने यंदाही सांस्कृतिक परंपरेचा भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ८ जानेवारी रोजी प्रभा मंगलम येथे आयोजित करण्यात आलेल्या “ईन हसीन वादियों से” या हिंदी–मराठी गीतांच्या बहारदार ऑर्केस्ट्राने संपूर्ण वातावरण संगीतमय करून टाकले.
अकादमीचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज शिरोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपलेली ही परंपरा यंदाही तितक्याच दिमाखात साकारली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्री-जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उद्घाटक डॉ. विलास कविटकर यांनी सावित्री जिजाऊंच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांची आजच्या पिढीला असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ वानखडे यांनी सावित्री जिजाऊंसह सर्व महान मातांच्या मूल्यांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक प्राचार्य सौ. संगिता गोरडे यांनी केले. स्व. डॉ. राजेंद्र कोकाटे यांना श्री. सुदर्शन टोपरे यांनी भावपूर्ण विनयांजली अर्पण केली. आभार प्रदर्शन वासुदेव काळे यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गुरव यांनी समर्थपणे सांभाळले.
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला ओंकार स्वरूपा ऑर्केस्ट्राचा सुरेल आविष्कार. प्रसिद्ध पार्श्वगायक तथा ऑर्केस्ट्राचे संचालक धर्मराज शिरोळे आणि त्यांच्या समवेत इंडियन आयडॉल-२ फायनालिस्ट यशश्री भावे यांनी किशोर कुमार, लता मंगेशकर, मुकेश, मोहम्मद रफी, शैलेन्द्र सिंग यांच्या अजरामर गीतांची सादरीकरणे करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित हजारो श्रोत्यांच्या मनावर मोहोर उमटवली.
अकादमीच्या वतीने गेल्या १८ वर्षांपासून हा कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असून अंजनगाव सुर्जीकर दरवर्षी या संगीतमय पर्वाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाही महिला-पुरुष रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल जुनघरे सर, नवनिर्वाचित नगरसेविका सौ. उज्वला कविटकर, प्रविण नेमाडे व उमेश भोंडे यांचा अकादमीचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. गजानन लवटे (आमदार), श्री. रमेश बुंदिले (माजी आमदार), श्री. कमलकांत लाडोळे (माजी नगराध्यक्ष), श्री. देविदास नेमाडे (माजी नगराध्यक्ष) यांच्यासह श्याम येऊल, गोपाल खलोकार, मोहन विधळे, श्री. सचिन कसबे व राहुल ठाकरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. श्रीकृष्ण गोरडे, डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ. अतुल डकरे, श्री. बाबुराव उंबरकर, श्री. विकास घोगरे, श्री. सुनिल उमक, श्री. गजानन चक्रनारायण, श्री. धिरज जयस्वाल, श्री. संजय कहाने, श्री. दिपक जावरकर, डॉ. सौ. स्पृहा डकरे, सौ. संगिता काळे व सौ. लता शिरोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी धर्मराज शिरोळे यांच्यासह आमदार गजानन लवटे व सिद्धार्थ वानखडे यांनी “सलामत रहे दोस्ताना हमारा” हे गीत सादर केले. संपूर्ण सभागृह या गीतात सामावून गेले आणि सर्व रसिकांनी एकत्रितपणे गाणे म्हणत या अविस्मरणीय संगीतमय संध्याकाळी उत्स्फूर्त दाद दिली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

011973
error: Content is protected !!