-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : मानवमूल्य, साहित्य आणि समाजकार्याच्या वाटेवर अखंडपणे कार्यरत असलेल्या अक्षर मानव या आंतरराष्ट्रीय संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. आझाद जामा खान यांची संघटनेच्या महाराष्ट्र राज्य नियंत्रकपदी निवड करण्यात आली आहे. पुण्यात पार पडलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
१९८१ पासून कार्यरत असलेली अक्षर मानव संघटना ही केवळ एक संस्था नसून मानवतेचा विचार रुजवणारी चळवळ आहे. साहित्य, कला, शिक्षण, पर्यावरण, विज्ञान, उद्योग, श्रम यांसह मानवी जीवनाशी निगडित तब्बल ९६ विषयांमध्ये समाजजागृतीचे कार्य करणारी ही संघटना जात, धर्म, पंथ, भाषा व भेदभावाच्या भिंती तोडत माणूस अधिक सजग, प्रामाणिक आणि संवेदनशील व्हावा, या उद्देशाने कार्यरत आहे.
या व्यापक विचारसरणीला कृतीची जोड देणारे आझाद खान हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, कायदा, अंकेक्षण तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत सक्रिय आहेत. यासोबतच ते एका खासगी कंपनीचे संस्थापक संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. अक्षर मानव संघटनेत त्यांनी जिल्हा अध्यक्ष, राज्य कार्यवाह, राज्य संघटक, विदर्भ पालकमंत्री, राज्य संचालक अशा जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. राज्यस्तरीय संमेलनांपासून ते तालुका व जिल्हा पातळीवरील उपक्रमांपर्यंत, लेखन कार्यशाळा व सामाजिक कार्यक्रमांद्वारे त्यांनी संघटनेच्या विचारांचा प्रसार केला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत अक्षर मानवचे विश्वस्त, ज्येष्ठ साहित्यिक व कथालेखक श्री. राजन खान यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. प्रवीण जावळे यांनी आझाद खान यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या निवडीमुळे राज्यातील तळागाळातील घटकांपर्यंत संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास राज्य कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
या प्रसंगी विविध विभागांसाठी अनुभवी संचालकांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या असून, परभणीचे धुराजी कांबळे, पनवेल–ठाण्याचे रोहिदास कावळे, मुंबईचे गोकुळ दशवंत, नागपूरच्या डॉ. यमुना नाखले आणि नाशिकचे तुषार अहीरे यांनी आझाद खान यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सामान्य कुटुंबातून पुढे येत गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत समाजकार्याची वाटचाल करणाऱ्या आझाद खान यांच्या या निवडीबद्दल अक्षर मानव संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच अमरावती व तिवसा परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com









