-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : एक काळ असा होता की माणसाच्या वेदना शरीरापुरत्याच मानल्या जात; मनही जखम होतं, अस्वस्थ होतं, आजारी पडतं हे समाजाला उमगतच नव्हतं. ‘मानसोपचार’ हा शब्द ऐकला की एखाद्या वेगळ्याच जगातल्या गोष्टीसारखा वाटे. पण काळ बदलला, विचार बदलले, जगण्याच्या धावपळीने माणसाच्या मनाला झिजवायला सुरुवात केली आणि मनाची काळजी घेणं ही रोजची गरज ठरू लागली.
याच बदलत्या मनस्वास्थ्याच्या पार्श्वभूमीवर अक्षर मानव संस्थेतर्फे दि. 13 आणि 14 डिसेंबर 2025 रोजी भिकोबा तांबे सभागृह, बारामती (जि. पुणे) येथे राज्यस्तरीय मानसोपचार परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेतील सर्व कार्यक्रमांसाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला असून समाजाला मानसोपचाराची खरी गरज समजावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. ही माहिती अक्षर मानवचे राज्य संघटक आणि विदर्भ संचालक आझाद जमा खान यांनी अमरावतीत दिली.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मानसिक अस्वस्थतेची संख्या वाढत आहे. मनावर झालेले घाव शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांपर्यंत पोहोचू लागले आहेत. अशा वेळी मनाला समजून घेणारे, ऐकून घेणारे आणि योग्य दिशा देणारे तज्ज्ञ अत्यावश्यक झाले आहेत. परंतु मानसोपचाराचा विषय अजूनही अनेकांसाठी धूसर आहे. या धुक्यातून दिशा दाखवण्यासाठी, तज्ज्ञांनी एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करावी, समस्यांवर विचारमंथन करावे आणि भविष्यातील मार्ग आखावा यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे, असे अमरावतीच्या जिल्हा सचिव अश्विनी वितोंडे-खान यांनी सांगितले.
या परिषदेची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्राचे नामवंत कथालेखक व कादंबरीकार राजन खान, तसेच राज्यभरातील प्रतिष्ठित मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर, समुपदेशक आणि सल्लागार उपस्थित राहणार असून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
“आपण या क्षेत्रात शिक्षण घेतलेलं असो, व्यवसाय करत असो किंवा या विषयात रस असो—या परिषदेच्या विचारपीठावर प्रत्येकासाठी जागा आहे. मानसोपचार क्षेत्राला नवी दिशा द्यायची असेल तर मनाशी बोलणाऱ्या सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं,” असे आझाद खान यांनी सांगितले.
परिषदेतील सहभागींसाठी दोन दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे. मेडिकोज गिल्ड, बारामती आणि अक्षर मानव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती राज्य संचालिका झरिना खान यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अक्षर मानवच्या राज्य कार्यकारिणीने केले आहे.
माणसाच्या मनाची ओल, वेदना आणि प्रकाश शोधण्याचा हा प्रवास—मनस्वास्थ्याचा नवा अध्याय लिहिणारी ही परिषद ठरावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






