चिखलदऱ्यात गटशेतीचा गौरवसोहळा; ‘GPL २०२५’ ने शेतकऱ्यांच्या एकतेचा जल्लोष

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) चिखलदरा : तालुक्यातील सामूहिक शेती चळवळीला नवी उंची देणारा ‘गटशेती प्रिमियर लीग २०२५’ सन्मान सोहळा मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी परतवाडा येथील मातोश्री सभागृहात अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात तालुक्यातील एकूण १९ शेतकरी गटांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रफुल सातव (उपविभागीय कृषी अधिकारी, अचलपूर), श्री. अतुल भारसाकळे (तालुका कृषी अधिकारी, चिखलदरा), श्री. अजिंक्य येवले (अभियान व्यवस्थापक, उमेद), मा. प्रियंका चरपे (तालुका व्यवस्थापक, माविम) तसेच मा. कल्याणी वडसकर (विभागीय समन्वयक, अमरावती) यांची उपस्थिती लाभली.

सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण होते. विविध शेतकरी गटांनी आपापल्या सजवलेल्या विशेष वाहनांतून कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. पारंपरिक पद्धतीने तिलक व पुष्पहारांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर तुषार तायवाडे व प्रशांत देवळे यांनी घेतलेल्या प्रेरणादायी सत्रांनी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

प्रमुख पाहुण्यांच्या आगमनानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर तीन यशस्वी गटांच्या निमंत्रकांनी ‘फार्मर कप’पासून ‘GPL’पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास सादर करत गटशेतीच्या ताकदीचे प्रभावी दर्शन घडवले.

मार्गदर्शन करताना श्री. प्रफुल सातव यांनी गटांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. गटशेती ही केवळ उत्पादनवाढीचे साधन नसून शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेचा मार्ग असल्याचे सांगत, ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री. अतुल भारसाकळे यांनीही कृषी विभाग शेतकरी गटांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली व एकत्रित प्रयत्नांतून गटशेतीने उल्लेखनीय यश मिळविल्याचे नमूद केले.

यानंतर उपस्थित सर्व शेतकरी गटांचा सन्मान टाळ्यांच्या कडकडाटात व आनंदी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव नायसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पंढरी हेकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नाली डोंगरे, रेणुका पोहकर व शुभांगी देवळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

हा सन्मान सोहळा म्हणजे चिखलदरा तालुक्यातील गटशेती चळवळीच्या यशाचा गौरव असून, भविष्यातील अधिक भक्कम वाटचालीचा आत्मविश्वास देणारा ठरला. 🌾✨

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!