-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : गुरुदेव नगरातील वातावरण नुकतेच आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेने भारले गेले होते. श्रीगुरुदेव योगा ग्रुप, गुरुदेव नगर (गुरुकुंज आश्रम) यांच्या पुढाकारातून ७ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय निःशुल्क इंटीग्रेटेड योग शिबिराचा आज सकाळी उत्स्फूर्त आणि भावनिक वातावरणात समारोप झाला. पहाटेच्या शांततेत दररोज श्रीगुरुदेव जलतरण तलाव मैदानावर भरलेल्या या शिबिराने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आरोग्याची नवी दिशा दिली. महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत तसेच चिमुकल्या बालयोगींनीही या शिबिरात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा आणि जीवनशैली मार्गदर्शनामुळे सहभागींच्या शरीरासह मनालाही नवी उर्जा मिळाली. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शन पतंजली युवा भारतचे प्रभारी श्री. अक्षयजी धानोरकर यांनी केले. त्यांच्या सोबत हरिद्वार येथील योगभूषण पुरस्कारप्राप्त डॉ. वंदना पराते, डॉ. अश्विनी राऊत, योगरत्न सारिका वासनिक, ललिता शेलोटकर, योगरत्न डॉ. मनिषा अमृतकर, योगप्रशिक्षक भीमराव सांगोळे तसेच डॉ. संगीता गोविंद मेण यांनी अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवातून योग केवळ व्यायाम नसून जीवनपद्धती असल्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचला. समारोप प्रसंगी आरोग्य क्षेत्रातील मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती कार्यक्रमास गौरव देणारी ठरली. उपस्थितांनी श्रीगुरुदेव योगा ग्रुपच्या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक करत पुढील काळातही असेच आरोग्यदायी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. शिबिरात नियमित सहभागी झालेल्या बालयोगींना आणि सर्व प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अखेरीस संत तुकडोजी महाराज लिखित ‘राष्ट्रवंदना’ सामूहिक स्वरात म्हटली गेली. त्या क्षणी परिसरात राष्ट्रप्रेम, शिस्त आणि आरोग्यसंकल्पाचा संगम अनुभवायला मिळाला. अथक परिश्रम घेणारे श्रीगुरुदेव योगा ग्रुपचे पदाधिकारी व स्वयंसेवक या यशामागील खरी शक्ती ठरले. “योगाचा नियमित सराव म्हणजे निरोगी, आनंदी आणि सकारात्मक आयुष्याची गुरुकिल्ली” हा संदेश देत हे आरोग्यशिबिर संस्मरणीय ठरले
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






