गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची लोकल सेवा पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात येणार आहे.
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पुढील तीन महिने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची लोकल रेल्वे सेवा पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम 88 दैनंदिन लोकल गाड्यांवर होईल. याबाबत नियोजन सुरू आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वेस्टर्न रेल्वेमध्ये रिडेव्हलेपमेंटचं काम सुरू आहे. वांद्रे आणि खारदरम्यानचा जुना रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल आणि बोरिवली दरम्यान, पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात हा पूल महत्त्वाचा आहे. उपनगरीय रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवणे, रेल्वेची गर्दी कमी करणे आणि भविष्यात प्रवाशांना उत्तम सेवा देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. सुरूवातीला या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती होती. परंतु, प्रवांशाची होणारी गैरसोय लक्षात घेता, हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.
लोकल सेवा विस्कळीत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर ते जानेवारीदरम्यान, कांदिवली ते बोरिवली सेक्शनमधील पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या बांधकामादरम्यान, दररोज 200 ते 250 लोकल गाड्या रद्द करण्यात येत होत्या. आता तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर याचे काम गोरेगाव ते सीएसएमटी विभागाकडे वळले आहे. जे तांत्रिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक मानले जात आहे.
प्रवाशांना थोडा दिलासा
दरम्यान, वांद्रे ते सीएसएमटीदरम्यान, लोकल ट्रेन सेवा सुरू राहिल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. वांद्रे आणि बोरिवलीदरम्यान, पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम आधीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे या विभागातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार नाही.
प्रकल्प किती मोठा?
पश्चिम रेल्वेच्या या विस्तार प्रकल्पाला अंदाजे, 964.84 कोटी खर्च आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. भविष्यात प्रवाशांना चांगल्या कनेक्टिव्हिटीचा फायदा होईल.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





